लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये चार आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्वाळा दिला. नामदेव हरी दयारे (४२), मालू ज्ञानेश्वर उईके (४६), गिरीश उत्तम गदाडे (४२) व श्याम दादू गोंडाणे (४७) अशी आरोपींची नावे असून ते पुलगाव येथील रहिवासी आहेत. ५ सप्टेंबर २००६ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने सरकार पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचून या चारही आरोपींना निर्दोष सोडले होते. त्यामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सरकारचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ॲड. मेहरोज खान पठाण यांनी कामकाज पाहिले.
अशी घडली घटना
मयताचे नाव राजकुमार पायेकर होते. २३ फेब्रुवारी २००५ रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपी नामदेव घरापुढे खड्डा करीत होता. इतर आरोपी त्याच्यासोबत होते. दरम्यान, राजकुमारने टोकल्यामुळे नामदेवला राग आला. त्याने राजकुमारच्या डोक्यावर सब्बल मारली. परिणामी, राजकुमार खाली कोसळला. त्यानंतर सर्व आरोपींनी त्याच्यावर पुन्हा सब्बल, काठ्या व गोट्यांनी हल्ला केला. त्यामुळे राजकुमार जागीवरच ठार झाला.
दंडाची रक्कम आईला
आरोपींनी दंड जमा केल्यास, ती संपूर्ण रक्कम मयताची आई शोभा पायेकर यांना देण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. तसेच, आरोपींनी रक्कम जमा केली की नाही, याचा अहवाल तीन महिन्यात सादर करावा, असे पुलगाव पोलीस निरीक्षकांना सांगितले.