अमरावतीच्या तान्या भोसले टोळीतील सात जणांना हायकोर्टाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:06 PM2018-10-02T18:06:12+5:302018-10-02T18:09:09+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोक्कातील सात आरोपींना सत्र न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोक्कातील सात आरोपींना सत्र न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला.
तान्या विठ्ठल भोसले ऊर्फ भोळे, ओमप्रकाश ऊर्फ ओम्या भारत भाटकर, दिलीप ऊर्फ किसन वाघ, अनिल भागवत मोहणकर, जन्या ऊर्फ जनार्धन रामराव वाघमारे ऊर्फ राजेश साने, नसरीनबानो रफिक शेख व रफिक शेख नबी शेख अशी आरोपींची नावे आहेत. ५ आॅगस्ट २०१४ रोजी अमरावतीमधील विशेष सत्र न्यायालयाने आरोपी वाघमारे, रफिक शेख व भोसले यांना १२ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त कारावास, आरोपी मोहणकर, वाघ व भाटकर यांना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व पाच लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त कारावास तर, आरोपी नसरीनबानो व अंजली ऊर्फ आरती जनार्धन वाघमारे यांना प्रत्येकी चार वर्षे सश्रम कारावास व दोन लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. अन्य आरोपी दिलीप कोरडे याला निर्दोष सोडण्यात आले होते. शिक्षा झालेल्या आरोपींनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी विविध बाबी लक्षात घेता अंजली वगळता इतर सर्व आरोपींचे अपील फेटाळून लावले व सत्र न्यायालयाचा त्यांच्यासंदर्भातील निर्णय कायम ठेवला. अंजलीचे अपील अंशत: मंजूर करण्यात आले. तिने आतापर्यंत भोगलेली शिक्षा पुरेशी ठरविण्यात आली. तसेच, दंड न भरल्यास भोगावयाचा कारावास दोन महिन्यापर्यंत कमी करून तिला हा कारावास भोगण्याचा आदेश देण्यात आला. सरकार पक्षानुसार आरोपी संघटितपणे गुन्हे करीत होते. ३१ आॅगस्ट २०१० रोजी त्यांनी अमरावती येथील खंडेलवाल ज्वेलरी दुकानात दरोडा टाकला होता. त्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी अन्य विविध गुन्ह्यांची कबुली दिली.