लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शहरात कोरोना रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरु करण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या कोविड-१९ समितीला दिले असून यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
कोरोना रुग्णांना नागपुरात बेड उपलब्ध होत नाही आहेत. यासंदर्भाच उच्च न्यायालयाने स्वत:हून दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने समितीला स्पष्ट आदेश दिले आहेत की, रुग्णांना काही वेळासाठी उपचार मिळू शकेल, यासाठी क्रीडा संकुल, सभागृह, शाळा, स्पोर्ट्स क्लब व रेल्वे, रुग्णालय, डब्ल्यूसीएल रुग्णालय माॅईल येथे डे केअर सेंटर सुरु करण्यात यावे. यासाठी समितीने स्वत: चांगल्या जागा निश्चित कराव्यात. त्याचे भाडे द्यावे, बेड उपलब्ध करावे, इथे काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून त्यांना मानधन द्यावे. ज्या गंभीर रुग्णांना रुग्णालयात तातडीने भरती करणे आवश्यक आहे, परंतु त्यांना बेड मिळत नाही आहेत, अशांसाठी हे सेंटर एक ट्रांझिट केअर सेंटर म्हणून सुद्धा काम करेल. यापूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पॅनलने न्यायालयात माहिती दिली की, सध्याची स्थिती पाहता अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात कोविड-१९ रुग्णालयासाठी येणारे अर्ज २४ तासाच्या आत मनपातर्फे मंजूर केले जात आहेत. याशिवाय कोविड रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्टसोबतच आरटीपीसीआर टेस्ट सुद्धा केली जात आहे.