लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रत्येकी १० वर्षे कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवून दोन गांजा तस्करांना जोरदार दणका दिला. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी नुकताच हा निर्णय दिला.मोबीन खान हफीज खान (६८) व तसलीम खान हलीम खान (५१) अशी आरोपींची नावे असून ते मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. २३ एप्रिल २०१४ रोजी विशेष सत्र न्यायालयाने या आरोपींना प्रत्येकी १० वर्षे कारावास व १ लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त करावास अशी शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सरकार पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात यशस्वी ठरल्याचे मत नोंदवून आरोपींचे अपील फेटाळून लावले व सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.आरोपींवर सावनेर पोलिसांनी कारवाई केली होती. २५ नोव्हेंबर २०१२ रोजी रात्री सावनेर पोलीस पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, त्यांना एक पांढऱ्या रंगाची कार नागपूरवरून सावनेरकडे जात असल्याचे दिसले. त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी कार थांबवून सखोल चौकशी केली असता कारमध्ये ८५.८१० कि.ग्रॅ. गांजाची एकूण १८ पाकीटे आढळून आली. तसेच, आरोपींजवळ एकूण १० हजार ६१० रुपये रोख रक्कम मिळून आली.