उच्च न्यायालय : अभिनेता विजय राजविरुद्धच्या गुन्ह्यावर उत्तरासाठी सरकारला वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 23:47 IST2021-06-14T23:46:48+5:302021-06-14T23:47:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रसिद्ध चित्रपट अभिनेता विजय राजने विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ...

उच्च न्यायालय : अभिनेता विजय राजविरुद्धच्या गुन्ह्यावर उत्तरासाठी सरकारला वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रसिद्ध चित्रपट अभिनेता विजय राजने विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर सादर करण्याकरिता राज्य सरकारला सोमवारी दोन आठवडे वेळ वाढवून देण्यात आला.
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने गेल्या २० एप्रिल रोजी सरकारला नोटीस बजावून १४ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, या कालावधीत सरकारला उत्तर सादर करण्यात अपयश आले. परिणामी, सरकारने दोन आठवडे वेळ वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती विनंती मंजूर केली.
नोव्हेंबर-२०२० मध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यामुळे चित्रपटातील सर्व कलावंत व इतर व्यक्ती गोंदियातील एका हॉटेलात थांबले होते. दरम्यान, विजय राजने एका महिलेचा विनयभंग केला, असा आरोप आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विजय राजविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नाेंदवला आहे. हा गुन्हा अवैध असल्याचा दावा विजय राजने याचिकेत केला आहे. महिलेचा विनयभंग केला नाही. तिने वाईट हेतूने तक्रार नोंदवली, असेही राजचे म्हणणे आहे.