नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नायलॉन मांजाच्या घातक परिणामांची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात आवश्यक आदेश देण्याकरिता स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. देवेंद्र चव्हाण यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रणय प्रकाश ठाकरे (२१) या तरुणाचा मंगळवारी इमामवाडा परिसरात नायलॉन मांजाने गळा कापून वेदनादायी मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच मानेवाडा येथे सौरभ पाटणकर (२२) हा तरुण नायलॉन मांजाने गळा कापण्यापासून थोडक्यात बचावला. त्याने वेळीच गळ्यापुढे हात धरला. त्यामुळे केवळ त्याच्या हाताला इजा झाली. तसेच, डिसेंबरमध्ये झिंगाबाई टाकळी येथे एका तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरला गेला. नायलॉन मांजामुळे यावर्षी अशा अनेक घटना घडल्या. नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसाठीही घातक ठरत आहे. नायलॉन मांजामुळे असंख्य पक्षी मृत्युमुखी पडले व गंभीर जखमी झाले आहेत. हा मांजा पशूंनाही इजा पोहचवत आहे.
राज्यात नायलॉन मांजा खरेदी-विक्री व वापरावर बंदी आहे. परंतु, काही व्यापारी पैशाच्या लालसेपोटी लपूनचोरून नायलॉन मांजाची विक्री करतात. त्यांना महानगरपालिका अधिकारी व पोलीस मदत करतात. त्यामुळे शहरात नायलॉन मांजाची खरेदी-विक्री व वापर जोरात सुरू आहे. नायलॉन मांजाला विरोध करणाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी अधिकारी काही व्यापाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करतात. मोठ्या माशांना मात्र मोकळे सोडले जाते. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरदेखील ठोस कारवाई केली जात नाही. परिणामी, नायलॉन मांजा घातक ठरत आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात याचिका दाखल करून घेतल्यामुळे परिस्थितीत समाधानकारक बदल होण्याची अपेक्षा केली जात आहे.
-------------
न्यायालयाला लोकमतची बातमी दाखवली
प्रणय ठाकरे या तरुणाच्या वेदनादायी मृत्यूमुळे व्यथित होऊन ॲड. सतीश उके यांनी बुधवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांना 'लोकमत'मधील बातमी दाखवून नायलॉन मांजाची खरेदी-विक्री व वापर थांबवण्याकरिता जनहित याचिका दाखल करून घेण्याची व यासंदर्भात प्रभावी आदेश जारी करण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने नियमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करून या विषयावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली.