लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मानसिक आजारी मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. आरोपीची दहा वर्षे कारावास व अन्य शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली. न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.विशाल ऊर्फ विलास देवमन तुमडाम (२८) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो चनाखाली, ता. सावनेर येथे रहात होता. ७ नोव्हेंबर २००७ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सरकार पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात यशस्वी ठरल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. ती इयत्ता नववीमध्ये शिकत होती. २९ जानेवारी २०१५ रोजी रात्री ९ च्या सुमारास मुलगी नैसर्गिक विधीकरिता गेली होती. दरम्यान, आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.पोक्सो कायदा बाल संरक्षणासाठीभारतीय संसदेने खास बालकांकरिता ‘लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम-२०१२’ लागू केला आहे. बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणे हा या अधिनियमाचा उद्देश आहे असे मत न्यायालयाने या निर्णयात नोंदवले.