उच्च न्यायालय : गणवेशात नसलेल्या वकिलाला फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:29 PM2021-06-15T23:29:31+5:302021-06-15T23:30:01+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका प्रकरणावरील ऑनलाईन सुनावणीच्या वेळी गणवेशात नसलेल्या वकिलाला फटकारून नियमांचे पालन करण्याची समज दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका प्रकरणावरील ऑनलाईन सुनावणीच्या वेळी गणवेशात नसलेल्या वकिलाला फटकारून नियमांचे पालन करण्याची समज दिली.
एका विद्यार्थिनीने शैक्षणिक मुद्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाला याचिकाकर्तीच्या वकिलाने गणवेश परिधान केला नसल्याचे लक्षात आले. न्यायालयाने त्यासंदर्भात विचारणा केली असता सुनावणीत सहभागी वरिष्ठ वकिलाने, ही बाब संबंधित वकिलाच्या निदर्शनास आणून दिली होती आणि त्यानंतरही ते साध्या वेशभूषेतच सुनावणीत सहभागी झाले असे सांगितले. न्यायालयाने संबंधित वकिलाचे हे नियमबाह्य वागणे गंभीरतेने घेतले. न्यायालयातील प्रत्येक वकिलाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी सतत शिष्टाचार व पद्धतशीरपणा जपला पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त करून संबंधित वकील गणवेशात उपस्थित होतपर्यंत याचिकेवर अंतिम सुनावणी करण्यास नकार दिला. तसेच, याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली.
माहिती लपवल्याने दावा खर्च बसवला
याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने न्यायालयात दाखल केलेल्या दिवाणी अर्जामध्ये न्यायालयाच्या आधीच्या आदेशाची माहिती दिली नाही. तो आदेश विद्यार्थिनीच्या विरोधात होता. न्यायालयाने त्यावरही आक्षेप घेतला व याकरिता विद्यार्थिनीवर पाच हजार रुपये दावा खर्च बसवला.