हायकोर्ट : कस्तुरचंद पार्क मैदान पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:38 PM2020-07-20T21:38:49+5:302020-07-20T21:39:56+5:30
शहराच्या हृदयस्थळी असलेले हेरिटेज कस्तुरचंद पार्क मैदान खड्डे बुजवून व इतर कामे पूर्ण करून दोन आठवड्यात पूर्ववत करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका, मेट्रो रेल्वे व इतरांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेले हेरिटेज कस्तुरचंद पार्क मैदान खड्डे बुजवून व इतर कामे पूर्ण करून दोन आठवड्यात पूर्ववत करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका, मेट्रो रेल्वे व इतरांना दिला.
यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कस्तुरचंद पार्क मैदानावर सध्या विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदान ठिकठिकाणी खोदण्यात आले आहे. जागोजागी झुडपे वाढली आहेत. काही दिवसांपूर्वी मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमणही करण्यात आले होते. न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपा व पोलिसांनी तातडीने हालचाली करून अतिक्रमण हटवले. परंतु, मैदानावरील खड्डे व झुडपे कायम आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरील आदेश दिला व पुढच्या तारखेपर्यंत मैदान पूर्ववत झाल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे तर, अॅड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.