हायकोर्ट : वर्धा-पुलगाव रोडचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 08:58 PM2019-11-27T20:58:23+5:302019-11-27T20:59:07+5:30
वर्धा ते सिंदखेड राजा हा महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा ते सिंदखेड राजा हा महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील वर्धा-पुलगाव रोडचे काम १८ डिसेंबर २०१९ पर्यंत व चिखली-जालना रोडचे काम जून-२०२० पर्यंत तर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारक्षेत्रातील पुलगाव ते जालना या २८५ किलोमीटर रोडच्या दुरुस्तीचे काम ऑगस्ट-२०२० पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
यासंदर्भात अॅड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वरील तारखा पुढील कार्यवाहीसाठी रेकॉर्डवर घेतल्या. चिखली-जालनामधील ११ किलोमीटर रोड वनक्षेत्रातून जातो. या ठिकाणी काम करण्यासाठी वन विभागाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे न्यायालयाने वन विभागाला एक महिन्यात आवश्यक परवानग्या देण्याचे निर्देश दिले. महामार्ग प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार, पुलगाव ते जालना रोडच्या दुरुस्ती कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ११० दिवसांचा वेळ लागणार आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने या काळात रोडची देखभाल कोण करेल, असा सवाल प्राधिकरणला विचारला व यावर उद्या (गुरुवारी) उत्तर सादर करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अॅड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.
अहवालावर मागितले उत्तर
न्यायालयाने अमरावती-मलकापूर महामार्गाच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्या अहवालातील शिफारशींवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीविषयी उद्या (गुरुवारी) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणला दिला आहे.