मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : रामकथा प्रवचनस्थळाला दिली भेटनागपूर : राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला विशेष महत्त्व असून रामकथेचे आपल्यावर संस्कार झाले, त्याचा उपयोग राज्यकारभार करताना होतो, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.रामदेवबाबा टेकडी परिसरात श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीतर्फे आयोजित रामकथा कार्यक्रमात ते बोलत होते. पूज्यसंत श्री विजय कौशलजी महाराज यांचे ११ जानेवारी पासून रामकथेवर प्रवचन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रामकथा स्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित, गोविंदलाल अग्रवाल, खासदार अजय संचेती, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. समीर मेघे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर उपस्थित होते.ज्या-ज्या वेळी राजसत्ता भ्रष्ट झाली त्या-त्या वेळी धर्म सत्तेचा आधार घेण्यात आला. प्रभू रामचंद्रांनी सामान्यातील सामान्य माणसाचे पौरुषत्व जागृत करून असुरी शक्तीवर विजय मिळवला, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला जी जबाबदारी मिळाली आहे ती यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल व कुठल्याही प्रकारे अधर्म होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पूज्यसंत श्री. विजय कौशलजी महाराज यांच्या हस्ते हनुमान कथा व भैय्या भरत या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, आज आनंदाचा दिवस असून या ऐतिहासिक रामकथेचा पाचवा दिवस आहे. योगायोगाने मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला रामकथेचा आस्वाद घेता आला. हा शुभसंदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला विशेष महत्त्व
By admin | Published: January 16, 2016 3:38 AM