राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिल महिना नागपूर जिल्ह्यासाठी अतिशय कठीण जात आहे. एप्रिलच्या २० दिवसात १,१०,३२२ नमुने पाॅझिटिव्ह आले असून, १३७९ रुग्णांचे जीव गेले आहेत. या महिन्यातील संक्रमितांचे आकडे पहिल्या लाटेतील सप्टेंबर महिन्यात मिळालेल्या एकूण रुग्णांपेक्षा अडीच पट अधिक आहेत. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे तपासलेले नमुने आणि एकूण संक्रमित रुग्णांची तुलना केल्यास सप्टेंबरप्रमाणेच या महिन्यातही दर चाैथा व्यक्ती विषाणू संक्रमित असल्याचे आढळून येते. एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४,१६,६३५ नमुने तपाण्यात आले, जे आतापर्यंत सर्वाधिक आहेत.
सप्टेंबर महिन्यात २४.६३ टक्के नमुने पाॅझिटिव्ह आढळून येत हाेते. यावर्षी एप्रिलमध्ये २६.४७ टक्के नमुने पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. म्हणजेच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत संक्रमित केवळ १.८४ टक्क्यांनी अधिक आहेत. सप्टेंबर महिन्यात एकूण १,९६,७२२ नमुने तपासण्यात आले, ज्यामधून ४८,४५७ नमुने संक्रमित आढळून आले. सप्टेंबर महिन्यात एकूण १४०६ मृत्यूची नाेंद झाली हाेती. महाराष्ट्राची एकूण सरासरीही २५ टक्क्यांच्या आसपास आहे. मार्च महिन्यात ३,७९,१४३ नमुने तपासण्यात आले, ज्यामधून ७६,२५० म्हणजे २०.११ टक्के लाेक पाॅझिटिव्ह आढळले. मार्चमध्ये ७६३ मृत्यूंची नाेंद करण्यात आली. वर्तमान काळात रुग्णालयात बेड मिळत नसल्यानेही मृत्यूचा आकडा वाढला आहे.
सर्वाधिक मृत्यूचा रेकार्डही माेडेल
एप्रिल महिन्यात २० दिवसात नागपूर जिल्ह्यातील १३७९ संक्रमितांनी जीव गमावला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात १४०६ रुग्णांचा मृत्यू झाला हाेता. ज्या वेगाने मृत्यू हाेत आहेत, त्यानुसार बुधवारीच मृत्यूचा रेकार्ड सप्टेंबरमधील सर्वाधिक मृत्यूचा रेकाॅर्ड पार करण्याची भीती आहे. नागपुरात आतापर्यंत ३,३६,३६० रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ६४७७ रुग्णांचा जीव गेला. सध्या ७१,६९२ सक्रिय रुग्ण आहेत आणि २,५८,१९१ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. यानुसार मंगळवारपर्यंत नागपुरात ७६.७० टक्के रुग्ण रिकव्हर झाले आहेत. १.९२ टक्के मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. २१.३८ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. केवळ एप्रिल महिन्याचा विचार केल्यास तपासलेल्या नमुन्यांपैकी २६.४७ टक्के पाॅझिटिव्ह आढळले तर १.२४ टक्के मृत्यूची नाेंद झाली.