लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : महानिर्मितीच्या वतीने रविवारी वीज उत्पादनातील ऐतिहासिक उच्चांक नोंदविण्यात आला. महानिर्मितीच्या सर्व वीज केंद्रांत रविवारी सकाळी ८.१५ वाजता वीज उत्पादन ८१०४ मेगावॅट नोंदविण्यात आले. हे वीज उत्पादन आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक वीज उत्पादन समजले गेले आहे.
यापूर्वी २५ मे २०१९ रोजी महानिर्मितीने ७६११ मेगावॅट वीजनिर्मिती करून एक उच्चांक प्रस्थापित केला होता. हा उच्चांक रविवारी ४९३ मेगावॅट वीजनिर्मिती करून नव्याने नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, या वीजनिर्मितीच्या ऐतिहासिक कामगिरीत कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची कामगिरी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. एकूण वीजनिर्मितीपैकी २४ टक्के (१९२५ मे.वॅ.) वीजनिर्मिती ही कोराडी येथील वीज केंद्रातून देण्यात आली आहे. कोराडी येथील जुन्या वीजनिर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक ६ मधून १८० मेगावॅट; तर संच क्रमांक ७ मधून १४१ मेगावॅट वीजनिर्मिती यावेळी प्राप्त झाली. तसेच येथील नवीन वीज प्रकल्पातील संच क्रमांक ८ मधून ५४२ मेगावॅट, संच क्रमांक ९ मधून ५२१ मेगावॅट, तर संच क्रमांक १० मधून ५४२ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली.
कोराडी वीज केंद्राच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्य अभियंता राजेश पाटील व राजकुमार तासकर यांचे अभिनंदन केले जात आहे. महानिर्मितीच्या या वीजनिर्मितीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने एका पत्रकाद्वारे केंद्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे यांनी व्यवस्थापकीय संचालक, सर्व संचालक, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कामगारांचे अभिनंदन केले.