महिलेसह दोघांना अटक : सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदऱ्यात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सोमवारी सायंकाळी पोलिसांनी छापा घालून महिलेसह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईल जप्त करण्यात आले.
सक्करदऱ्यातील आशीर्वाद नगरमध्ये एका वाईन शॉपच्या मागे एक महिला आणि तिचा साथीदार हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून हा कुंटणखाना चालविणारी रोशनी ऊर्फ लक्ष्मी हरीश हटवार (३५) तसेच तिचा साथीदार मोहम्मद रिजवान मोहंमद रज्जाक सौदागर (२४) सोबत संपर्क केला. सात हजार रुपयात अल्पवयीन वारांगना उपलब्ध करून देण्याची या दोघांनी तयारी दाखवली. त्यानुसार पोलिसांचा पंटर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास पोलीस पथकाला माहिती देऊन आरोपी रोशनी तसेच रिजवान राहत असलेल्या घरी गेला. तेथे ग्राहकाकडून ७ हजार रुपये घेतल्यानंतर या दोघांनी त्याला एक अल्पवयीन वारांगना आणि रूम उपलब्ध करून दिली. त्याच वेळी पोलिसांच्या पथकाने या कुंटणखान्यावर छापा घातला. रंगेहात सापडलेल्या वारांगनेने पैशाचे आमिष दाखवून आरोपी रोशनी तसेच रिजवान आपल्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी रोशनी तसेच रिजवानविरुद्ध पिटा आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाईल तसेच ७ हजार रुपये रोख असा एकूण २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक मंगल हरडे, हवालदार अनिल अंबाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
---
एक आठवड्यापूर्वी सुरू
आरोपी रोशनी हटवार गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट चालविते. यापूर्वी ती वेगवेगळ्या ठिकाणी कुंटणखाना चालवित होती. तिच्या गोरखधंद्याचा संशय आल्याने शेजाऱ्यांनी तिच्यावर नजर ठेवणे सुरू केले. त्यामुळे तिने १ आठवड्यापूर्वी भगत यांच्याकडून ४ हजार रुपये महिना भाड्याने घर घेतले आणि हा कुंटणखाना सुरू केला.
---