नरेश डोंगरे ।
नागपूर - देशभर खळबळ उडवून देणाऱ्या सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील महाराष्ट्र कनेक्शनचे धागेदोरे आता अंडरवर्ल्डच्या माध्यमातून नागपूरपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या नजरा येथील कारागृहात बंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्याकडे वळल्याची सूत्रांची माहिती आहे.
देशभर खळबळ उडवून देणाऱ्या सिद्धू मुसेवाला हायप्रोफाईल मर्डर केसमध्ये दरदिवशी नवनवे खुलासे होत आहेत. तिहार कारागृहात कट शिजला अन् सिद्धूचा गेम करणाऱ्या ८ शूटर्समधील दोघे पुण्यातील (संतोष जाधव आणि साैरव महाकाळ) असल्याचे यापूर्वीच तपास यंत्रणांनी जाहिर केले आहे. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली असतानाच आता काही तासांपूर्वी या दोघांमधील संतोष जाधवचे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी कनेक्शन असल्याचीही चर्चा तपास यंत्रणांमधून पाझरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉन अरुण गवळीची पत्नी आशा गवळीसोबत संतोष काही ठिकाणी आढळला होता, अशी माहिती पुढे आल्याने मुसेवाला हत्याकांडाचे गवळी टोळीसोबत काय कनेक्शन आहे, त्याची माहिती घेतली असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, अरुण गवळी गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या कारागृहात बंद आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकरच्या हत्या प्रकरणात त्याला कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबई-पुण्यातील कारागृहात अंडरवर्ल्डमधील गवळीविरोधी अनेक टोळ्यांमधील खतरनाक गुंड बंदिस्त असल्याने तिकडच्या कारागृहात गवळीला ठेवल्यास कारागृहातच चकमकी झडू शकतात, असा कयास बांधून गवळीला मुंबईहून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. सुमारे सात वर्षांपासून अधिक काळापासून तो नागपुरातील कारागृहात बंदिस्त असला तरी मध्येमध्ये तो संचित आणि अभिवचन रजेवर बाहेर (मुंबईला) जातो. मुंबईतून अंडरवर्ल्डचा सफाया झाल्याचे मानले जात असतानाच देशातील हायप्रोफाईल ठरलेल्या मुसेवाला हत्याकांडाशी गवळीटोळीचे कनेक्शन संतोष जाधवच्या रुपाने पुढे आल्याने तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
अद्याप तसे काही नाही...।
विशेष म्हणजे, या हायप्रोफाईल प्रकरणाचे कटकारस्थान दिल्लीतील तिहार कारागृहात शिजल्याचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या तपासातून उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर कारागृहात असलेल्या अरुण गवळीची चाैकशी करण्यात येत आहे का, बाहेरून काही तपास अधिकारी नागपुरात आले का किंवा येणार आहे का, अशी विचारणा लोकमतने येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे आज केली. यावेळी येथील अधिकाऱ्यांनी ‘अद्याप तसे काही नाही’ असे उत्तर दिले.
---