नागपूर : हिंगणा येथील डोंगरगाव येथे फार्म हाऊसवर अमली पदार्थांच्या सेवनासह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी छापा मारला. पोलीस आल्याने आयोजकांनी पार्टीतून ड्रग्ज आणि आक्षेपार्ह वस्तू अगोदरच बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर यालाही पकडले आहे. या पार्टीला हिंगणा पोलिसांचा आश्रय मिळाल्याच्या माहितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
हिंगणा येथील डोंगरगाव येथे गिरनार फार्म हाऊस आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका ग्रुपने या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत नफीस, शिवा व एक तरुणी हे प्रमुख होते आणि त्यांनी सिंगल तसेच ग्रुप एन्ट्री ठेवली होती. सिंगल एंट्रीसाठी अकराशे आणि ग्रुप एंट्रीसाठी ३० ते ५० हजार रुपये ठेवण्यात आले होते. या पार्टीत तरुण-तरुणींशिवाय संशयित आणि व्यावसायिक गुन्हेगारही मोठ्या संख्येने आले होते. पार्टीच्या आयोजनासाठी हिंगणा पोलिसांना आधीच विश्वासात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पार्टी आयोजित करण्यासाठी आणि मद्यासाठी पोलिसांची परवानगीही घेण्यात आली होती. सायंकाळपासून पार्टीला सुरुवात झाली होती, त्यात दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली होती. पार्टीत दारूसोबत अमली पदार्थांचे सेवनदेखील सुरू होते असे सांगण्यात येत आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास नाईट राऊंड करत असलेले पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना पार्टी आणि सुमित ठाकूरच्या उपस्थितीची माहिती मिळाली. राजमाने यांनी तातडीने त्यांच्या पथकासह गिरनार फार्म हाऊसवर छापा टाकला.
पोलिस छापा टाकणार असल्याने हिंगणा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ आयोजकांना सावध केले. त्यानंतर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आयोजकांचे साथीदार मागच्या दाराने पळून गेले. राजमाने आणि त्यांचे पथक फार्म हाऊसमध्ये दाखल होताच पार्टीत गोंधळ उडाला. दरम्यान, हिंगणा पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पार्टी आणि कारमध्ये दारू सापडली. आयोजकांनी दारू पिण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे सांगितले.
त्यानंतर परवानगी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आयोजकांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली. या प्रकरणात सुमित ठाकूरवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. चौकशी केल्यानंतर सुमितला पोलीस ठाण्यातून सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टी आयोजक नफीसचे शहरातील अनेक वादग्रस्त लोकांशी संबंध आहेत.
ठाणेदार परदेशींची बदली
हिंगणा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.एस. परदेशी यांची तत्काळ प्रभावाने बदली केली आहे. परदेशी हे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे विशाल माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार दिवसांत हलगर्जीपणामुळे ठाणेदाराची बदली झाल्याची ही दुसरी घटना आहे. २९ जून रोजी विवेकानंद नगर गोळीबार प्रकरणी धंतोलीचे ठाणेदार महेश चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.