जगदीश जोशी
नागपूर : उपराजधानीतील देहव्यापारात परदेशी मुलींना मोठी मागणी आहे. येथे परदेशी मुलींची नियमित ये-जा असते. पोलिसांनी पकडलेल्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार मनोज ऊर्फ मोनू याचे जवळपास पाचशे कायमस्वरूपी ग्राहक आहेत. हे ग्राहक स्वत: किंवा त्यांच्या जवळचे लोक परदेशी मुलींची सेवा घेत असत. यामध्ये शहरातील तथाकथित प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे. मोनूच्या अटकेने त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
गुन्हे शाखेच्या एसएसबीने सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनलवर छापा टाकून मोनूला उझबेकिस्तानच्या दोन मुलींसह पकडले. या दोन्ही मुली काही दिवसांपूर्वीच भारतात आल्या होत्या. त्यांनी त्यांचा व्हिसा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे दिल्लीत सुरक्षित ठेवली. व्हिसाची मुदतही १९ सप्टेंबरला संपली. दिल्लीत बनावट आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्होटर कार्ड बनवून मुली वेश्याव्यवसाय करू लागल्या. मोनू गेली अनेक वर्षे परदेशी मुली पुरवणाऱ्या दिल्ली-मुंबईतील अनेक बड्या रॅकेटशी संबंधित आहे. त्यामुळेच नागपुरात जेव्हा परदेशी मुलींची गरज भासते तेव्हा हौशी त्याच्याशीच संपर्क साधतात.
मोनूच्या सांगण्यावरून दिल्लीतून उझबेकिस्तानमधून एका तरुणीला २ सप्टेंबर रोजी नागपुरात पाठविण्यात आले. १३ सप्टेंबर रोजी दुसरी तरुणी आली. मोनूने उझबेकिस्तानच्या मुलींना राहण्यासाठी हॉटेलची खोली ऑनलाइन बुक केली होती. प्रथम नंदनवन येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला. पुढे सदरच्या तुली इंटरनॅशनलमध्ये ‘शिफ्ट’ झाले. दोघांना बनावट भारतीय ओळखपत्रावर प्रवेश मिळाला.
मोनू फक्त जुन्या ग्राहकांना किंवा त्यांच्या संपर्कातून आलेल्या लोकांना सेवा देतो. ज्यामुळे पकडले जाण्याचा धोका कमी होतो. सौदा झाल्यानंतर मुली पैसे घेतात व त्या मोनूला कमिशन देतात. पोलिसांनी मोनूकडून दोन मोबाइल जप्त केले आहेत, ज्यामध्ये पाचशे ग्राहकांव्यतिरिक्त संपूर्ण रॅकेटचा रेकॉर्ड आहे. मोनू व दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही २३ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
७ दिवसांत मतदार ओळखपत्र प्राप्त झाले
२६ ऑगस्ट रोजी उझबेकिस्तानमधून एक तरुणी भारतात आली. त्यानंतरच ७ दिवसांनी म्हणजेच २ सप्टेंबर रोजी ती नागपुरात पोहोचली. याच काळात तिला मतदार ओळखपत्र देण्यात आले. हे मतदार कार्डही मूळ नसून त्याची झेरॉक्स प्रत होती.
वकिलाच्या सांगण्यावरूनच सही करण्याची भूमिका
उझबेकिस्तानच्या मुली हिंदी बोलतात. यावरून त्यांचे भारतात वर्षानुवर्षे वास्तव्य असल्याचे दिसून येते. त्या ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देत होत्या, त्यावरून त्यांनी अगोदरदेखील पोलिसांचा सामना केल्याचा अंदाज आहे. वकिलाला विचारल्यानंतरच कोणत्याही कागदपत्रावर सही करू, अशी भूमिका त्यांनी घेतली.