सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरक्षेसाठी आणि नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एच.एस.आर.पी.) लागून येणार आहेत. उत्पादकांकडून मिळणाऱ्या वाहनांवर डीलर ‘टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ व ‘थर्ड रजिस्ट्रेशन मार्क’सहित उपलब्ध करून देतील. त्यानंतर लवकरच जुन्या वाहनांनाही या नंबर प्लेटची सक्ती केली जाणार आहे.केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९च्या नियम ५० अनुसार वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट विहीत नमुन्यात बसविण्याची तरतूद आहे. २०१३ मध्ये परिवहन विभागाने या नंबर प्लेटचे उत्पादन, पुरवठा, छपाई व वाहनांवर बसवण्यासाठी निविदा मागविली होती. ही नंबर प्लेट राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवापुरवठादारामार्फत नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसविण्यात येणार होत्या. दरम्यानच्या काळात काही राज्यात या नंबर प्लेट सारखी दिसणारी नंबर प्लेट बसविल्या जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. अखेर डीलरकडून विक्री होणाऱ्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ अनिवार्य करण्याची सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम असणारवाहनावर एकदा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावल्यानंतर ती पुन्हा काढता येणार नाही. यासाठी एका विशिष्ट क्लिपद्वारे ती वाहनाला लावण्यात येईल. अॅल्युमिनियमपासून तयार केलेली ही प्लेट असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेल्या या नंबर प्लेट्स टॅम्परप्रूफ असणार आहेत. या नंबर प्लेटवर निळ्या रंगाचे चक्राचे होलोग्राम असणार आहे. सोबतच तसेच वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत ‘इंडिया’ (इंग्रजीतील शब्द) ही अक्षरे राहतील.
डीलरच देतील जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’राज्यात १ एप्रिलपासून डीलरकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या नवीन वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) असणार आहे. जुन्या वाहनांनाही डीलरच या नंबर प्लेट लावून देतील. या नंबर प्लेटमुळे गैरप्रकारांना आळा बसेल.-शेखर चन्ने, आयुक्त, परिवहन विभाग