नागपुरात हायटेन्शन लाईनमुळे एसएनडीएल, नासुप्र, मनपाला येणार टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:41 PM2018-06-05T22:41:53+5:302018-06-05T22:42:06+5:30
नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका व एसएनडीएल यांना हायटेन्शन वीज लाईनमुळे टेंशन येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विशेष समितीने पहिला अहवाल तयार केला असून त्यात या तिन्ही संस्थांनी ३३ केव्हीच्या नारा फिडरवरील अनेक धोकादायक रहिवासी बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका व एसएनडीएल यांना हायटेन्शन वीज लाईनमुळे टेंशन येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विशेष समितीने पहिला अहवाल तयार केला असून त्यात या तिन्ही संस्थांनी ३३ केव्हीच्या नारा फिडरवरील अनेक धोकादायक रहिवासी बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर केला जाणार आहे.
समितीमध्ये सात तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीने नारा फिडरच्या मार्गावरील बांधकामांची पाहणी केली आहे. मे-२०१८ पर्यंतच्या पाहणीचा प्रथम अहवाल तयार करण्यात आला आहे. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी एकत्रितपणे नारा फिडरच्या मार्गावर केवळ ७० धोकादायक रहिवासी बांधकामे असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. समितीच्या अहवालानुसार या मार्गावर १२२ धोकादायक रहिवासी बांधकामे आहेत. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी अन्य धोकादायक बांधकामे का लपवली याची करणे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय समितीने अन्य विविध महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवून त्यासंदर्भात प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची विनंती न्यायालयास केली आहे.
आरमर्स बिल्डर्सने नारी येथील सुगतनगरात अवैधरीत्या बांधलेल्या एका इमारतीमध्ये प्रियांश व पीयूष धर या जुळ्या भावंडांचा हायटेन्शन लाईनमुळे गेल्यावर्षी मृत्यू झाला. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मध्यस्थातर्फे अॅड. शशिभूषण वाहणे कामकाज पाहत आहेत.
समितीची निरीक्षणे
- नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी हायटेन्शन वीज लाईनखालील झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष केले. हायटेन्शन वीज लाईन झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांकरिताही धोकादायक आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे.
- अनेक घरमालकांनी लो-टेन्शन लाईन(४४० व्होल्टस्)पासून हातभर अंतरापर्यंत बांधकामे केली आहेत. त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लो-टेन्शन लाईनदेखील प्राणघातक आहे. या लाईनमुळे अनेक प्राणघातक दुर्घटना घडल्या आहेत.
- वीज सुरक्षा नियमांची पायमल्ली करून करण्यात आलेली बांधकामे तातडीने तोडणे आवश्यक आहे.
- दाट लोकवस्तीच्या परिसरात एअर बंच केबलची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे वीजचोरी व वीज गळतीवर नियंत्रण मिळविता येईल. तसेच, विजेच्या धक्यामुळे होणारे मृत्यू थांबविता येतील.