लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेकडून भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली जात नसताना, भाजपकडून मात्र नरमाईचीच भूमिका घेण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबतच युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेलाच ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल. तसेच ज्या पक्षाच्या जागा जास्त येईल, तोच ‘मोठा भाऊ’ ठरेल व त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात केले. सोमवारी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.शिवसेना व भाजपा यांची युती ही अनेक वर्षांची आहे. २०१४ मध्ये काही कारणांमुळे दोन्ही पक्षांना सोबत राहता आले नव्हते. मात्र दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असून, पुढील निवडणुकांसाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊ. शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवणे ही आमची लाचारी नव्हे तर तो मैत्रीचा एक भाग आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये एकट्या भाजपचेच दोनशेहून उमेदवार निवडून येतील. मात्र मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून आहे, असे दानवे यांनी सांगितले. काँग्रेसकडून केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी खालच्या पातळीवर उतरून पंतप्रधानांवर आरोप करण्यात येत असल्याचा चिमटादेखील त्यांनी काढला.राज्यभरात सर्व जागांवर अद्याप ‘बूथप्रमुख’ नाहीचदरम्यान, रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेदरम्यान भाजपच्या बूथप्रमुख योजनेची आकडेवारी मांडली. राज्यात सुमारे ९२ हजार ‘बूथ’ आहेत. यातील ८५ हजारहून अधिक ‘बूथ’वर पक्षाने प्रमुख नेमले आहेत, असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ अद्यापही भाजपला सर्व ठिकाणी ‘बूथप्रमुख’ नेमता आलेले नाहीत.राममंदिर नव्हे विकासाच्या मुद्यावर लढणारदेशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या मागील काही निवडणुकांपासून ‘नोटा’च्या मतांचा भाजपला फटका बसताना दिसतो आहे. याबाबतीत दानवे यांना विचारणा केली असता पुढील निवडणुकीत ‘नोटा’चे प्रमाण निश्चितपणे कमी असेल, असे ते म्हणाले. पुढील निवडणुका आम्ही राममंदिराच्या मुद्यावर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढू. राममंदिराच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेदेखील त्यांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तारराज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येईल. मात्र अद्याप याबाबतची तारीख निश्चित झालेली नाही, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. भाजपातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील चित्र सकारात्मक आहे. पहिल्या परीक्षेत सर्वच आमदार उत्तीर्ण झाले आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.