लोकमत न्यूज नेटवर्कलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात बुधवारी सर्वाधिक, सात मृत्यूची नोंद झाली असताना गुरुवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. ३०४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील १३७ रुग्ण नागपुरातील आहेत, तर याच जिल्ह्यातून दोन मृताचीही नोंद झाल्याने विदर्भात एकूण मृतांची संख्या १९० झाली आहे. विशेष म्हणजे, भंडाऱ्यातही आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे निदान होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या तपासण्यांना वेग येण्यासाठी आता सर्वच जिल्ह्यात रॅपिड अॅण्टीजेन चाचणीला सुरुवात झाली आहे. यामुळे मोठ्या संख्येत चाचणी होत असून रुग्णसंख्याही वाढण्याची शक्यता आहे.
त्यानुसार नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांची रॅपिड तपासणी केली असता १३२ पॉझिटिव्ह आले. इतर ठिकाणाहूनही पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपुरात रुग्णांची संख्या २०६४ झाली आहे. या शिवाय दोन रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२ वर पोहचली आहे. १४०० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यातील आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे साकोली येथील आहेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या १५५ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही आज रुग्णांची संख्या वाढली. २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ७७९ वर पोहचली आहे. अकोला जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली असून आज मृत्यूची नोंंद झाली नसल्याने काहिसा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. येथील रुग्णसंख्या १८२८ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. येथील रुग्णसंख्या ३७७ झाली अहे.
वाशिम जिल्ह्यातही झपाट्याने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. २० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १६९ वर पोहचली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १४ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १३८ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १४ कोरोनाबाधितांचे निदान झाले. रुग्णसंख्या १४८ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या १९५झाली आहे. आज यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात रुग्णाची नोंद झाली नाही.