नागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे. रविवारी दैनंदिन रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठला. ४,९२४ नवे रुग्ण आढळून आले तर ३१ रुग्णांचा जीव गेला. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्येचा विक्रम मोडीत काढत ११ मार्च रोजी ४,५२७ दैनंदिन रुग्णसंख्येने नवा विक्रम स्थापन केला होता. परंतु आज पुन्हा हा विक्रम मोडीत निघाला. नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारावर रुग्ण पॉझिटिव्ह आले. २२५२ रुग्ण व १२ मृत्यूची नोंद झाली. दरम्यानच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात कमी झालेली रुग्णसंख्येतही पुन्हा वाढ झाली. ६६१ रुग्ण व ४ मृत्यूची भर पडली. अकोला जिल्ह्यातही रुग्ण वाढले. ५३७ रुग्ण व २ मृत्यू झाले. यवतमाळ जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. ४७० रुग्ण व ३ मृत्यूची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे. ३८३ रुग्ण व ६ मृत्यू आहेत. वर्धा जिल्ह्यात २०१ रुग्ण व २ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात १६० रुग्ण व १ मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात ११८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विदर्भात एकूण रुग्णसंख्या ३,७०,७४० झाली.
जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू
नागपूर : २२५२: १७०५०२: १२
वर्धा : २०१ : १४८३३: ०२
गोंदिया : ४१ : १४७०६ : ००
भंडारा : ७० : १४३२५ : ०१
चंद्रपूर : ११८ : २४७७८ : ००
गडचिरोली : ३१ : ९८८६ :००
अमरावती : ३८३ : ४२४९७ : ०६
वाशिम : १६० : ११२१९ : ०१
बुलडाणा : ६६१ : २५१३० : ०४
यवतमाळ : ४७० : २१२६५ : ०३
अकोला : ५३७ : २१५९९ : ०२