जगदीश जोशी
नागपूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आयुष्य कंठणाऱ्या हैदराबाद आणि अन्य शहरांतील अनेक शिक्षक आणि विद्यार्थी गांजा तस्करीच्या व्यवसायात उतरले आहेत. केवळ दहा-वीस हजार रुपयांसाठी तस्करांचे कुरिअर बनून गांजा पोहोचवत आहेत.
त्यांच्या मदतीने गांजा तस्कर आपले जाळे पसरवित आहेत. यातील गंभीरता लक्षात घेऊन हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडून एनडीपीएस सेलकडे सोपविण्यात आले आहे. बेलतरोडी पोलिसांनी १३ मार्चला हैदराबाद येथील २७ वर्षीय शिक्षक शिवशंकर इसमपल्ली याला कारमध्ये गांजा घेऊन जाताना पकडले. तो १३ लाख ७३ हजार रुपयांचा गांजा घेऊन दिल्लीला चालला होता. सर्वसाधारण कुटुंबातील हा नृत्यशिक्षक आहे. कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या बेरोजगारीने तो हतबल झाला. १० हजार रुपयांत गांजा पोहोचवायला तयार झाल्याचे त्याने सांगितले. हैदराबाद येथील स्पोर्ट्स टीचर विनोद याच्या माध्यमातून तो गांजा तस्करीत सहभागी झाला. पोलिसांनी या माहितीवरून विनोदलाही हैदराबादमधून अटक केली. विनोद बास्केटबॉलचा चॅम्पियन व सुप्रसिद्ध कोच आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये त्याने सहभाग घेतला आहे. मात्र, कोरोनामुळे तो बेरोजगार झाला. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने गांजा तस्करीत सहभागी झाला. एका खेपेचे १० हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितल्याने तो तयार झाला.
शिवशंकरला पकडण्यापूर्वी हैदराबादमधून एक कुरिअर टीम दिल्लीसाठी रवाना झाली होती. शिवशंकरला अटक झाल्याचे कळताच ही टीम रस्त्यातच थांबली. बेलतरोडी पोलिसांना ही टीम ग्वालियरमध्ये असल्याचे कळले. त्यांनी तत्काळ ग्वालियर एटीएसला माहिती दिली. त्यांनी वाहनाच्या क्रमांकावरून या टीमला पकडले. तिघांना अटक करून ९० किलो गांजा जप्त केला. शिवशंकर आणि विनोदसारखे अनेक शिक्षक आणि विद्यार्थी बेरोजगारीमुळे या व्यवसायात उतरले आहेत. त्यांच्याकडे ओळखपत्र असते. पोलिसांनी चौकशी केलीच तर ओळखपत्र दाखवून ते मार्ग काढतात. पोलिसांनाही संशय येत नाही.
...
गांजा लपविण्यासाठी खास जागा
गांजा लपविण्यासाठी कारमध्ये खास जागा बनविलेली असते. कारची मागची सीट आणि डिक्कीमध्ये असलेल्या खास जागेत ठेवलेला गांजा सहजासहजी दिसत नाही. बेलतरोडी आणि ग्वालियर एटीएसलासुद्धा ही जागा आधी लक्षात आली नाही. बारकाईने तपासणी केल्यावर हे लक्षात आले. शिवशंकर आणि विनोद ज्या तस्करासाठी काम करतात त्याच्याकडे अशा प्रकारच्या चार कार आहेत. त्यातील दोन पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. हैदराबाद आणि लगतच्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या डझनावर वाहनांमधून देशभर गांजा पोहोचविला जात आहे.
...