नागपूर : महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: मृत्यूचे सापळे बनले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांत महामार्गांवरील अपघातांमध्ये ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मृत्यूच्या आकड्यांमध्येदेखील २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१९ सालापासून ते जून २०२२ या कालावधीत विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले, किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, यात पोलिसांची संख्या किती होती आदी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०२१ साली महामार्गांवर १ हजार २१७ अपघात झाले. त्यात ८६४ लोकांचा मृत्यू झाला व ६३३ नागरिक जखमी झाले. परंतु यावर्षी सहा महिन्यांतच अपघातांचे प्रमाण वाढले. जानेवारी ते जून या कालावधीत ९९४ अपघात झाले व त्यात ५४४ जणांचे बळी गेले असून, ४६४ नागरिक जखमी झाले.
या कारणांमुळे होतात अपघात
-वाहनचालकांचा हलगर्जीपणा
-भरधाव वेग
-ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न
-नशा करून वाहन चालविणे
- नियमांचा भंग करणे
साडेतीन वर्षांत दर महिन्याला १३१ अपघात
२०१८ पासूनची आकडेवारी पाहिली तर साडेतीन वर्षांत नागपूर विभागातील महामार्गांवर ५ हजार ५२६ अपघात झाले. त्यात ३ हजार २४९ नागरिक मरण पावले व २ हजार ३५२ नागरिक गंभीर जखमी झाले. दर महिन्याला सरासरी १३१ अपघात झाले व सरासरी ७७ जणांचा जीव गेला.