- रोजगार हिरावला तर निर्माण केले पर्याय : रडगाणे न गाता काळाशी देत आहेत लढा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या आणि व्यवसायही बुडाला. ज्यांच्याकडे थोडीफार शिल्लक होती, त्यांनी ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा करत वाट बघितली तर काहींनी आपल्या व्यथा सरकारदरबारी मांडत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. पण काहींनी ‘संघर्ष हेच आपले जीवन आहे’ ही गोष्ट मनाशी बांधत ‘रुकना नहीं’ असे म्हणत मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. कुणाकडे हात पसरण्यापेक्षा आपला गाडा आपणच हाकावा, ही भावना मनाशी बांधत त्यांनी पर्याय शोधले. येणारे प्रत्येक संकट हे तुमची परीक्षा असते आणि या परीक्षेत उत्तीर्ण झालो तर पुढचे संकट सौम्य वाटतात, ही अनेक हतबल तरुणांसाठी प्रेरणा ठरतात.
प्रेसचे काम थांबले, कबाडीचे काम सुरू केले ()
गजानन जैस हा २१ वर्षीय तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताचीच म्हणून तो वर्धमाननगर येथील एका प्रेसच्या दुकानात कापड प्रेस करतो. त्यातील मिळकतीच्या भरवशावर तो आपल्या शिक्षणाचा खर्च करतो. मात्र, कोरोना संक्रमणामुळे नागरिकांनी प्रेस करण्यासाठी कपडे देणे बंद केले आणि ते दुकान बंद पडले. तेव्हा त्याने प्रारंभी एका कंपनीकडून सोयामिल्कच्या बॉटल्स रिटेलमध्ये विकण्यास सुरुवात केली. तेथूनच रिकाम्या बॉटल्स जमा करून कबाडीचे काम सुरू केले. आता तो अनेक कंपन्यांना रिकाम्या बॉटल्स पुरवतो.
कोट -
माझा खर्च मलाच चालवायचा आहे, हे घरच्या परिस्थितीवरून लहानपणापासूनच समजले होते. त्यामुळे, प्रेसचे काम बंद पडल्याने थांबणे हा गुन्हा होता, ही माझी समज. मी तात्काळ काही ज्येष्ठांच्या सहकार्याने कबाडीचे काम सुरू केले.
- गजानन जैस
नोकरी गेली तर भाजीपाला विक्री सुरू ()
कृष्णा ठाकरे हा २२ वर्षीय तरुण लॉकडाऊनपूर्वी एका कार वॉशिंग सेंटरमध्ये नोकरीला होता. त्याला तेथे १५ ते २० हजार रुपये पगार होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. घरी आई-वडील व भाऊ आहे. गेल्याच वर्षी त्याचे लग्नही झाले. त्यामुळे, त्याने कशाचाही विचार न करता घराचा गाडा चालविण्यासाठी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. हातठेल्यावर तो वस्तोवस्ती फिरतो. त्यांच्या स्वभावामुळे आणि जिद्दीमुळे ग्राहकही त्याच्यावर खूश आहेत. आज तो १५-२० हजार रुपये कमवत नाही. मात्र, येणारे उत्पन्न परिश्रमाचे असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो.
कोट -
नोकरी गेली म्हणून थांबणे, हा श्राप समजतो. जो थांबला तो गेला. माझ्या आणि कुटुंबीयांसाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहे. कुणी एक-दोन दिवस देईल. आयुष्यभर पोसणार नाही. आज संघर्ष असला तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील.
- कृष्णा ठाकरे
........................