हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 7, 2024 07:04 PM2024-05-07T19:04:36+5:302024-05-07T19:05:23+5:30
Nagpur : न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणीही केली
नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली व न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी कठेरिया यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन आवश्यक आदेश देण्यासाठी या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी निश्चित केली.
गैरवर्तणुकीच्या कारणावरून पीएच.डी. उमेदवारी रद्द करून विद्यापीठ परिसरात प्रवेश नाकारल्या गेल्यामुळे पीडित विद्यार्थी निरंजनकुमार प्रसाद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ९ फेब्रुवारी रोजी कुलसचिवांना नोटीस बजावून याचिकेवर १६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ती नोटीस कुलसचिवांना तामील झाली होती. असे असतानाही १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठातर्फे कोणीच न्यायालयात हजर झाले नाही. परिणामी, न्यायालयाने वादग्रस्त कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देऊन संशोधन कार्य करू देणे आवश्यक होते. परंतु, प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देण्यात आला नाही. करिता, न्यायालयाने २३ एप्रिल रोजी कुलसचिव काथेरिया यांना अवमान नोटीस बजावली व २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, काथेरिया २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर झाले, पण त्यांच्या स्पष्टीकरणामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध न्यायालय अवमानाचे दोषारोप निश्चित केले व त्यावर योग्य भूमिका मांडण्यास सांगितले. त्यानुसार, कठेरिया यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाच्या आदेशाचा जाणिवपूर्वक अवमान केला नाही. अनवधानाने चुक झाली आहे. प्रसाद यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले.