लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास १० हजार वर्षे प्राचीन आहे. हिंदू संस्कृतीत केलेली कालगणना अचूक असून विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक रवींद्र देशपांडे यांनी केले.हिंदू धर्म-संस्कृती मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात ‘हिंदू संस्कृतीची वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक, समाजसेवक रमेश मंत्री होते. व्यासपीठावर हिंदू धर्म संस्कृती मंदिराचे अध्यक्ष गुरुनाथ ऊर्फ बापू भागवत उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, हिंदू संस्कृतीला स्वरूप देणारे अनेक महापुरुष, संत सर्व कालखंडात उदयास आले. कोणत्याही राष्ट्राचे प्राणतत्त्व म्हणजे संस्कृती होय. राष्ट्राच्या प्रगतीची मुळे संस्कृतीत असतात. राष्ट्राला झेप घ्यायची असल्यास संस्कृतीची मुळे घट्ट असणे गरजेचे असते. त्यामुळे हीच बाब हेरुन इंग्रजांनी हिंदू संस्कृतीची मुळे कापून टाकली. प्रगती साधण्यासाठी कोणत्याही राष्ट्राला संस्कृतीची ओळख असली पाहिजे. हिंदू संस्कृती विज्ञाननिष्ठ नसून हिंदू संस्कृतीत अंधश्रद्धा असल्याचा गैरसमज पसरविण्यात येतो. परंतु हिंदू संस्कृतीसारखी विज्ञाननिष्ठ दुसरी संस्कृती नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, वैज्ञानिक रचनेनुसार हिंदू संस्कृतीची रचना झाली आहे. हिंदू संस्कृतीत अस्पृश्यतेला थारा नाही. हिंदू संस्कृतीचा इतिहास उज्वल, पराक्रमाचा आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीची सर्वोच्च शिखरे हिंदू संस्कृतीने पादाक्रांत केली आहेत. हिंदू संस्कृती सुवर्णयुग निर्माण करणारी आहे. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. देशातील देवीदेवतांचा प्रवास एकात्मतेकडे नेणारा आहे. सगळे ज्योर्तिलिंग देशभरात पसरले आहेत. एकात्म समाज जीवन घडविण्यासाठी विशाल प्रयत्न संस्कृतीत केले गेले. हिंदू संस्कृती आध्यात्मिक आहे. स्वत:चा शोध घेऊन आत्मज्ञान प्राप्त केले की सृष्टीचा अर्थ कळतो. हिंदू संस्कृती व्यक्तीला आत्मविकासाकडे नेणारी आहे. आत्मविकास झाला की माणूस व्यापक होऊन त्याचा परिणाम भौतिक विकासावर होऊन समाज विकसित होतो. परंतु पाश्चिमात्य लोक संस्कृतीचा शोध भौतिक सुखात घेतात. हिंदू संस्कृतीत १०० कोटी लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकांनी देदीप्यमान इतिहास डोळ्यापुढे ठेवून जीवन पद्धती विकसित केल्यास आपण देशाला मार्गदर्शन करू शकतो असा विश्वास व्यक्त करून २१ वे शतकही हिंदू संस्कृतीचेच राहणार असल्याचे सांगितले. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. आभार करुणा साठे यांनी मानले.
विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ : रवींद्र देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:55 PM
हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास १० हजार वर्षे प्राचीन आहे. हिंदू संस्कृतीत केलेली कालगणना अचूक असून विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक रवींद्र देशपांडे यांनी केले.
ठळक मुद्दे‘हिंदू संस्कृतीची वाटचाल’यावर व्याख्यान