मा. गो. वैद्य : जांबुवंतराव धोटे यांना सावरकर गौरव पुरस्कार प्रदाननागपूर : हिंदू हा असा धर्म आहे, ज्यात अनेक संप्रदाय आणि समुदाय समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळेच हा धर्म राष्ट्रभाव निर्माण करणारा आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू राष्ट्राचे अभिमानी होते. या भूमीला माता संबोधताना सावरकर म्हणतात तुझ्यासाठी मरण हे जगणे, तुझ्याविना जगणे हे मरण. या भारतमातेसाठी, हिंदूराष्ट्रासाठी सावरकरांनी आपले जीवन अर्पण केले. त्यामुळे हिंदूराष्ट्राला धर्म मानून त्याचा अवमान करू नका, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांना स्वातंत्रवीर सावरकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा.गो. वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाला समितीचे कार्याध्यक्ष शिरीष दामले, जांबुवंतराव धोटे यांच्या पत्नी, विजयाताई धोटे, ज्येष्ठ साहित्यिक वि. स. जोग उपस्थित होते. शुक्रवारी हा सोहळा विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात पार पडला. शिरीष दामले व मा.गो. वैद्य यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख देऊन जांबुवंतराव धोटे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सावरकरांबद्दल विचार व्यक्त करताना धोटे म्हणाले सावरकर हे महाकाव्य होते. परंतु आमचा देश या महान क्रांतिकारकांना विसरला आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांचे कुठलेही योगदान नाही, त्यांचे देव्हारे या देशात उभे राहत आहे. हा देश जातीपातीत कंठीस्त झाला आहे. पुरोगाम्यांचे लोण वाढले आहे. हिंदूला गोचित पकडले आहे. या देशासाठी आज जात हा फाळणीचा शब्द झाला आहे. प्रास्ताविक मुकुंद पाचखेडे यांनी केले. (प्रतिनिधी)
हिंदू हा राष्ट्रभाव निर्माण करणारा धर्म
By admin | Published: February 27, 2016 3:20 AM