लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून हिंदूंना कट्टर म्हणण्यात येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे शनिवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचा जीवनव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.शंकरनगर येथील साई सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, विदर्भ प्रमुख अतुल पिंगळे, संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे हेदेखील उपस्थित होते. हिंदुत्व सर्वसमावेशक आहे व सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची आपल्या देशाची ती परंपरा राहिली आहे. आज देशात वैचारिक संकुचितता असणारे लोक स्वत:ला ‘लिबरल’ असे म्हणवून घेतात. जे लोक देशाला विविध तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचे स्वप्न पाहत आहेत ते ‘सेक्युलर’ म्हणून ओळख सांगतात. मात्र या शब्दाचा मराठी, हिंदीत अनुवाद नाही. संविधानाच्या निर्मात्यांनीदेखील संविधानात धर्मनिरपेक्ष असा शब्द टाकला नव्हता; कारण त्यांना त्याची जाण होती, असेदेखील डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.पत्रकारितेला ‘मिशन’ मानल्या जात होते. आता यात बदल दिसून येत आहे. मात्र आजदेखील अनेक ध्येयनिष्ठ पत्रकार समाजात आहेत. पत्रकारितेत नैतिकता व मर्यादेचे पालन करणे हे मोठे आव्हान आहे. पत्रकार हे समाजरचनेचे केंद्र झाले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी केले.नारद जयंतीनिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार तसेच स्तंभलेखकांचा सन्मान करण्यात येतो. यंदा प्रिंट मीडियातून अनंत कोळमकर, इलेक्ट्रॉनिक मीडियातून कुमार टाले व स्तंभलेखकांतून कर्नल अभय पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. हे पुरस्कारांचे दहावे वर्ष होते. महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम यांनी आभार मानले.पत्रकारांनी सामाजिक दृष्टी जपावीपत्रकार हे समाजाचा अविभाज्य घटक असतात. मात्र अनेकदा त्याचा विसर पडल्याचे दिसून येते. पत्रकारांनी समग्र सामाजिक दृष्टी बाळगण्याची गरज आहे. समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केली पाहिजे. व्यावसायिक स्पर्धेमागे न पळता समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.