नागपूर : बांगलादेशमधील हिंसाचारापासून देशातील हिंदूंनी धडा घेत अन्यायाविरोधात एकत्रितपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. रेशीमबाग येथे शनिवारी झालेल्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते बोलत होते. इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे यावेळी प्रमुख अतिथी होते.
डॉ. भागवत म्हणाले, बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. जोपर्यंत तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत, तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्याक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. भारत सरकारने तेथील हिंदूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घ्यायला हवा. भारतातदेखील अवैध घुसखोरी सुरू असून, त्यामुळे लोकसंख्येचे असुंतलन निर्माण होत असून, ही गंभीर बाब आहे.
दुर्बल राहणे हा अपराध आहे. त्यामुळे हिंदू समाजाने संघटित होत सशक्त होणे ही काळाची गरज आहे. अशा हिंसाचाराच्या घटनांमध्ये जोपर्यंत मदत येत नाही, तोपर्यंत लोकांनाच आजूबाजूच्या समाजाचे रक्षण करावे लागते, असे डॉ. भागवत म्हणाले.