लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)च्या स्थापनेपासूनचा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा आजही कायम आहे व वेळोवेळी कृती बदलून त्यावर काम केले जाते. विचारसरणी देशासाठी घातक असून विषमतेला खतपाणी घालणारी आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक प्यादे आहेत. कदाचित भविष्यात त्यांच्यापेक्षा कट्टर व्यक्ती पदावर येईल तेव्हा देशातील संविधानिक संस्था वाचविण्यास वेळही मिळणार नाही. सध्या या संस्था टिकून आहेत व ही संधी आहे. त्यामुळे संघ विचारांपासून वेळीच सावध व्हा, असे आवाहन कॅरावान पत्रिकेचे संपादक हरतोश सिंह बल यांनी केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बहुजन संघर्ष समिती, भारिप, मराठा सेवा संघ, सत्यशोधक समाज, संभाजी ब्रिगेड व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित प्राचार्य या. वा. वडस्कर स्मृती व्याख्यानात हरतोश सिंह बोलत होते. न्यायमूर्ती लोया यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण बल यांनीच उघडकीस आणले होते़ त्यांनी संघाच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी लिखित ‘बंच आॅफ थॉट’मधील विचारच संघाचे तत्त्वज्ञान आहे़ मुस्लीम व ख्रिश्चन हिंदू राष्टÑाचा भाग नाहीत आणि सिख, बौद्ध व इतर अल्पसंख्यकांना सांप्रदायिक ठरविणे ही संघाची मूळ भावना आहे. मोदी सरकारच्या काळात देशातील मुस्लीम आणि दलितांवरील हल्ले वाढले असून, लोकशाहीच्या संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. माध्यमांवर दबाव आणि न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ वाढली. स्वयंसेवी संस्थांना दाबले जात आहे़ स्पष्ट बोलत नसले तरी संघाचा आरक्षणाला विरोध आहे़ महात्मा गांधी मुस्लिमांचे लाड पुरवितात, असे गोळवलकर म्हणायचे़ गांधीजींच्या हत्येत संघाची भूमिका संशयास्पद आहे. संघाने आपली विचारधारा रुजविण्यासाठी सेवेचा बुरखा पांघरला असून, त्या माध्यमातून लोकांना हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे परिवर्तित करण्याचे काम विविध संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे. अण्णा हजारे, योगगुरू रामदेवबाबा यांच्या आंदोलनामागेही संघ असल्याचा आरोप करीत संघ ही चर्चेस तयार न होणारे ‘बौद्धिक झोंबी’ निर्माण करणारी संस्था असल्याचे टीकास्त्र बल यांनी सोडले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व राष्ट्रीय ओबीसी मंचचे संयोजक डॉ़ बबनराव तायवाडे, प्रभारी प्राचार्य पी़ एस़ चंगोले, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी, प्रा़ विशाखा वडस्कर, मिलिंद पखाले, आऱ एस़ मोटघरे, अॅड. आकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कट्टर हिंदुत्वाच्या संकल्पनेत पंतप्रधान मोदी केवळ एक प्यादे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:22 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)च्या स्थापनेपासूनचा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा आजही कायम आहे व वेळोवेळी कृती बदलून त्यावर काम केले जाते. विचारसरणी देशासाठी घातक असून विषमतेला खतपाणी घालणारी आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक प्यादे आहेत.
ठळक मुद्देसंघ ही बौद्धिक झोंबी निर्माण करणारी संस्था : हरतोश बल यांचा घणाघात