लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : हिंगणा-केळझर (जिल्हा वर्धा) हा राज्य महामार्ग मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. या मार्गावरील आमगाव (देवळी) ते मयालदेव या नऊ कि.मी. अंतरात अगणित खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण रस्त्याला डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हिंगणा-केळझर हा मार्ग नागपूर व वर्धा या दाेन जिल्ह्यांना जाेडणार असल्याने या मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. या मार्गावरील आमगाव (देवळी) ते मयालदेवदरम्यान तयार झालेल्या खड्ड्यांची संख्या बरीच माेठी आहे. या खड्ड्यांचा आकार व खाेली दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावरून किमान एकदा तरी प्रवास केल्यास हा राज्य महामार्ग आहे, असे मुळीच वाटत नाही. मार्गक्रमण करताना वाहनचालकास सतत खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करावा लागताे. समाेरून अथवा मागून माेठे वाहन आल्यास माेठी पंचाईत हाेते. वाहनांच्या चाकांमुळे खड्ड्यातील गढूळ पाणी वाहने व अंगावर उडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागताे.
या मार्गाची काही वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली हाेती. त्यात डांबर कमी आणि बारीक गिट्टीचा वापर अधिक करण्यात आला हाेता. पावसामुळे त्या कामाच्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडले असून, रस्त्यावर सर्वच बारीक गिट्टी विखुरली आहे. या रस्त्यावर पाऊस काेसळल्यास डबक्यातील पाणी तर काेरड्या वातावरणात धूळ व वाहनांच्या चाकांमुळे उडणाऱ्या बारीक गिट्टीचा त्रास सहन करावा लागताे. या मार्गावरील पुलाचे काम करण्यात न आल्याने पुरामुळे वाहतूक ठप्प हाेते. त्यामुळे ही समस्या नेमकी कधी साेडविली जाणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
...
या रस्त्यावर नेत्यांनी प्रवास करावा
खड्ड्यांमुळे अपघात तर वाढले आहेतच, साेबतच या रस्त्यावर नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाेबत वाहनातील प्रवाशांना पाठ, कंबर व मानदुखीचा, तसेच मणक्यांचा त्रास वाढला आहे. वाहने खड्ड्यांमधून जात असल्याने धक्क्यांमुळे वाहनांचे नुकसान हाेते. शिवाय, टायर पंक्चर हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नेत्यांनी या रस्त्यावर किमान एक-दाेनदा वेगात प्रवास करावा, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.