हिंगणा: हिंगणा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी संचालकपदाच्या १८ जागासाठी तितकेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक अविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीवर गत दोन टर्मपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री रमेश बंग यांच्या गटाचे वर्चस्व आहे.
जिल्ह्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच निवडणूक अविरोध होणारी हिंगणा बाजार समिती पहिली ठरली आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार संचालकपदासाठी ६ ते १४ सप्टेंबर दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करायचे होते. यावेळी बंग यांच्या गटाला शह देण्यासाठी विरोधी गट या निवडणुकीत उतरणार, असे चित्र होते. मात्र मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत भाजपसह इतरही विरोधी पक्षाच्यावतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ही निवडणूक आता अविरोध होईल. निवडणूक कार्यक्रमानुसार १५ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. २९ सप्टेंबरला अर्ज मागे घेणे, ३० तारखेला चिन्ह वाटप व ९ ऑक्टोबरला मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी करण्यात येणार होती. परंतू १८ जागासाठी तितकेच अर्ज आल्याने हिंगणा बाजार समितीची निवडणूक होणार नाही. निवडणूक अधिकारी अविरोध आलेल्या संचालकांची नावे निवडणूक वेळापत्रकानुसार जाहीर करतील.१८ सदस्यसंख्या असलेल्या बाजार समितीत सेवा सहकारी संस्थामधून ११, अडते-व्यापारी मतदारसंघातून २, तोलारी-मापारी-हमाल १, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ असे एकूण १८ संचालक निवडले जातात.