हिंगणा : तालुक्यातील ५ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी २० मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सातगाव, आसोला (सावंगी), किन्ही (धानोली), दाभा व खडकी या पाच ग्रामपंचायतमधील १७ प्रभागात एकूण ५१ सदस्यांकरिता ही निवडणूक होती. ५१ जागांकरिता १४७ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६३.७२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण १२,०२२ मतदारांपैकी ९,२५९ मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान दाभा ८३.१५ टक्के तर सर्वात कमी ७०.७० टक्के मतदान सातगाव वेणानगर येथे झाले. निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार संतोष खांडरे यांनी काही मतदान केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर व तापमापक यंत्र ठेवण्यात आले होते. तालुक्यात केवळ पाच ग्रामपंचायतमध्ये निवडणुका असल्याने चुरस जरी नसली तरी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मात्र या गावांकडे हजेरी लावताना दिसत होते.
हिंगणा तालुक्यात ५ ग्रा.पं.साठी ७७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:13 AM