लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवासात आपल्या बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करता यावे यासाठी दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष ही योजना सुरू केली. सुरुवातीला वर्षभर हिरकणी कक्ष सुरू होता. परंतु मागील वर्षभरापासून नागपूर जिल्ह्यात ही योजनाच महामंडळाने बंद केल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.एसटी महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यात हिरकणी कक्ष नावाची योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली. यात बसस्थानकावर महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी एक कक्ष उपलब्ध करून दिला. एक टेबल आणि खुर्ची या कक्षात उपलब्ध राहायची. काही दिवस ही योजना सुरळीत चालली. परंतु त्या काळातही एसटी महामंडळाने महिलांसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, याबाबत ध्वनिक्षेपकाहून कुठलीही माहिती महिला प्रवाशांना दिली नाही. ज्या महिलांनी प्रसार माध्यमात बातमी वाचली असेल अशाच मोजक्या महिलांना या योजनेची माहिती होती. सध्या नागपूर जिल्ह्यात सर्वत्र ही योजना गुंडाळल्याची स्थिती आहे. गणेशपेठ, मोरभवन, रामटेक, सावनेर, उमरेड, काटोल आदी आगारात ही योजना बंद करण्यात आली आहे. योजना सुरू करायची त्याचा गाजावाजा करायचा आणि काही दिवसानंतर लोकोपयोगी असलेली योजना बंद करायची या एसटी महामंडळाच्या भूमिकेमुळे प्रवाशांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासात स्तनपान करताना महिला प्रवाशांची होणारी कुचंबणा दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू करावा, त्याबाबत महिला प्रवाशांमध्ये जागृती करावी अशी मागणी होत आहे. याबाबत विभाग नियंत्रक अशोक वरठे यांना विचारणा केली असता हिरकणी कक्ष सुरू करण्याबाबत आगार प्रमुखांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अद्याप कोणत्याही बसस्थानकावर ही योजना झाल्याचे दिसत नाही.
एसटी महामंडळाची हिरकणी कक्ष योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:37 PM
प्रवासात आपल्या बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करता यावे यासाठी दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष ही योजना सुरू केली. सुरुवातीला वर्षभर हिरकणी कक्ष सुरू होता. परंतु मागील वर्षभरापासून नागपूर जिल्ह्यात ही योजनाच महामंडळाने बंद केल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
ठळक मुद्देमहिला प्रवाशांची गैरसोय : सार्वजनिक ठिकाणी करावे लागतेय स्तनपान