'त्याचा' मृत्यू चाकूमुळे, बंदुकवाल्याला जामीन
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: November 13, 2023 04:40 PM2023-11-13T16:40:18+5:302023-11-13T16:42:43+5:30
हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यातील प्रकरण
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती जिल्ह्यातील एका हत्या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्ती चाकूच्या हल्ल्यामुळे ठार झाल्यासह अन्य काही बाबी लक्षात घेता बंदुक हाताळणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा निलंबित केली व त्याला सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला.
अब्दुल गनी अब्दुल सत्तार (४५) असे आरोपीचे नाव असून तो चांदूर बाजार येथील रहिवासी आहे. मृताचे नाव मोहम्मद एजाज होते. सत्तारने एजाजवर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, पण त्या गोळ्या एजाजला लागल्या नाही. त्यानंतर दुसरा आरोपी मोहम्मद अरमान अब्दुल रेहमान (२२) याने एजाजला पकडून चाकूने भोसकले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार आहे. ही घटना ४ मार्च २०२० रोजी घडली. सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. दरम्यान, सत्तारने अपील निकाली निघतपर्यंत जामीन मागितला होता. त्याची मागणी मंजूर करण्यात आली. सत्तारतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली