सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार सोहळा : प्राजक्त देशमुख यांचा सन्माननागपूर : त्यांचे जगणेदेखील कविता होते, त्यांचे संस्कारदेखील कविताच होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कवितेचाच ध्यास होता अन् मृत्यूनंतरदेखील कवितेनेच त्यांना लोकांच्या हृदयात अमर केले. कवितेतून मानवी भावनांचा शोध घेणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री डॉ.सुलभा हेर्लेकर यांच्या स्मृती आजदेखील ताज्याच आहेत. डॉ.सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार सोहळ्याप्रसंगी याचे प्रत्यंतर आले. शंकरनगर चौक येथील राष्ट्रभाषा संकुल परिसरात श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठान व वैदर्भीय लेखिका संस्था अभिव्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमप्रसंगी उदयोन्मुख कवी व नाटककार प्राजक्त देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यिका आशा बगे व डॉ.कविता शनवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिक येथील अभिनेता, नाटककार , दिग्दर्शक व कवी प्राजक्त देशमुख यांचा डॉ.कविता शनवारे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राजक्त देशमुख यांनी ‘कवीचा मृत्यू’ आणि ‘भर पाणी भर...’ या दर्जेदार कविता सादर केल्या. माझे एकही पुस्तक छापून आले नसतानादेखील पुरस्कार देण्यात येत आहे, हेच या पुरस्काराचे वेगळेपण आहे व यापुढे कवितांच्या माध्यमातून सर्वांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करील असे देशमुख म्हणाले.डॉ.हेर्लेकर यांच्या कवितांमधून सौदर्य झळाळते. त्यांच्यात रसिकदृष्टी होती व कवितेच्या माध्यमातून त्या भावभावनांचा शोध घ्यायच्या. त्यांच्या कवितेतून दिसणारी संवेदनशीलता तरुणांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन डॉ.शनवारे यांनी केले. आशा बगे यांनी डॉ.हेर्लेकरांच्या आठवणींना उजाळा दिला. कवितेच्या मातीतच त्यांचा जन्म झाला होता व नवोदितांसाठी त्या हक्काच्या मार्गदर्शक होत्या या शब्दांत बगे यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. याअगोदर वैदर्भीय लेखिका संस्था अभिव्यक्तीच्या वतीने डॉ.सुलभा हेर्लेकर यांच्या ‘आरस्पानी’ या कवितासंग्रहावर आधारित ‘आरस्पानी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन कल्याणी गोखले यांनी केले. संकल्पना संहिता सुप्रिया अय्यर यांची होती. कार्यक्रमाच्या संयोजिका मनीषा साधू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शुभदा फडणवीस यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)
आठवणींतून त्यांची कविता वर्तमान होते
By admin | Published: August 01, 2014 1:11 AM