अभय लांजेवार
उमरेड : लगीनगाठ बांधल्यानंतर आयुष्यभर सुखदु:खाचे साक्षीदार ते दोघेही होते. मुलाबाळांचे आणिक नातवंडांचे झाल्यानंतर दोघेही काही महिन्यांपासून अंथरुणाला खिळले. दोघेही आजारी झाले. अशातच पत्नीचे निधन झाले. स्मशानभूमीच्या दिशेने पत्नीची प्रेतयात्रा निघाली अन् इकडे पतीचीही प्राणज्योत मालवली. उमरेड जोगीठाणा पेठ येथील ही दु:खद घटना तायडे कुटुंबीयांच्या वाट्याला आली आहे. अर्जुन नागोजी तायडे (७६) आणि इंदूबाई अर्जुन तायडे (६७) रा. जोगीठाणा पेठ उमरेड, अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
१९७० ला अर्जुन आणि इंदूबाई विवाहबंधनात अडकले. पन्नास वर्षाचा सांसारिक गाडा या दोघांनी विपरीत आणि खडतर परिस्थितीशी दोन हात करीत चालविला. परिस्थिती अतिशय नाजूक. अशावेळी अर्जुन तायडे यांची पोलीस दलात वर्णी लागली. दोघांच्याही संसाररूपी वेलीवर पावलोपावली सुखाचीच सावली होती. चार मुले, दोन मुली आणि नातवंड असा तायडे दाम्पत्याचा मोठा परिवार आनंदात होता. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास इंदूबाई तायडे यांचे निधन झाले. आप्तस्वकीय, गोतावळा गोळा झाला. गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृत इंदूबाई यांचे प्रेत अंत्यविधीसाठी उचलण्यात आले. वाहनात ठेवले. क्षणभरात पुन्हा धावाधाव सुरू झाली. इकडे अंथरुणावर पडलेले पती अर्जुन तायडे यांनीही जगाचा निरोप घेतला होता. दुहेरी दु:खाने सारेच भारावले. लागलीच इंदूबाई यांचे प्रेत अंत्यविधीसाठी भिवापूर मार्गावरील स्मशानभूमीवर नेण्यात आले. त्यानंतर अर्जुन तायडे यांचीही प्रेतयात्रा निघाली. दोघांवरही एकाचवेळी रात्री ८ वाजताच्या सुमारास अंत्यविधी पार पडला.
--------------------------------------------
लागोपाठ धक्के
सुमारे सहा महिन्यापूर्वी अर्जुन तायडे यांना अर्धांगवायूचा धक्का बसला. दुसरीकडे लागलीच पत्नी इंदूबाई यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांचीसुद्धा बायपास सर्जरी केल्या गेली. दोघेही अंथरुणावर खिळले. लागोपाठच्या धक्क्यातून तायडे कुटुंबीय कमालीचे अस्वस्थ झाले.