प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नाठाळांच्या हवाली रत्ने बहुरूप, चोरून नेणे ठरती सद्गुण’अशीच स्थिती शहरातील वारसा स्थळांची झाली आहे. आपल्याकडील ऐतिहासिक वारसा स्थळांची आपल्याकडूनच होत असलेली उपेक्षा आपल्याच पथ्यावर कशी पडते, याचे हे प्रमुख उदाहरण होय. शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या वेळाहरी या गावात दोनशे वर्षे जुनी भोसलेकालीन बाहुलीविहीर आहे. मात्र, याकडे ना पुरातत्त्व विभागाचे ना पर्यटन विभागाचे लक्ष आहे. अशीच स्थिती राहिली तर आज मोडक्या-तोडक्या अवस्थेत किमान दिसत असलेली ही पुरातन विहीर केवळ दंतकथांमध्येच रममाण असणार आहे.
बेसा स्वामिधाम मंदिराच्या मार्गावरून थेट आऊटर रिंगरोडवर वेळा (हरिश्चंद्र) हे ऐतिहासिक गाव आहे. रिंगरोड पार केले की लागलीच ही बाहुलीविहीर लागते. अगदी समारोसमोर मोक्षधाम घाट आहे तर पुढे दोन किलोमीटर अंतरावर पुरातन श्री बिनशिरा टुंडा मारुती मंदिर आहे. या बाहुलिविहिरीच्या अभ्यासाठी अधामधात वास्तुविशारद शास्त्राचे अभ्यासक येत असतात.
विशेष म्हणजे, अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथील अलबामा विद्यापीठाच्या कला इतिहासतज्ज्ञ प्रोफेसर डॉ. कॅथलिन कमिंग्स गेल्या चार वर्षांपासून अभ्यासासाठी येथे येत आहेत. त्यांना भोसलेकालीन वारसा स्थळांविषयी प्रचंड आस्था असून, विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर ते येथे येत असतात. या वारसा स्थळाची नोंद अलबामा विद्यापीठ घेऊ शकते. मात्र, नागपुरातील विद्यापीठाला हे स्थळ ठाऊक आहे का, हे सांगणे कठीण. एवढेच नव्हे तर वारसा स्थळांची निगा राखणाऱ्या भारतीय पुरातत्त्व विभाग आणि महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचेही इकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. शासकीय संस्थांकडून होत असलेल्या या उपेक्षेमुळे येथे अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. सध्या हे वारसास्थळ खासगी मालमत्तेत येत असल्याचे दिसून येते.धनाच्या शोधासाठी लागली होती रीघ: चार-पाच वर्षापूर्वी याच बाहुलीविहिरीच्या आत मोठे धन साठवले आहे, अशा धारणेने बरेच लोक रात्रीच्या वेळेस येथे खोदकाम करत असत. गावातील लोकांना ही बाब कळताच आरडाओरड केल्यावर ते पळून जात असत, अशी माहिती गावातील काही लोक देतात.दोनशे वर्षे जुनीही बाहुलीविहीर दोनशे वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. कुणी बांधली, याची माहितीही मिळत नाही. ही विहीर जमिनीखाली दोन मजली इतकी आहे. सध्या पावसाळ्यामुळे ही विहीर पाण्याने तुडुंब आहे. दरवाजावर महिरप, भिंतींवर मूर्ती सुरेख आहेत. विहिरीतील पाणी निकासीसाठी मोटची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे मुख्य विहिरीला लागून तेथेच बाजूला जलतरणाची व्यवस्था आहे. कपडे बदलण्यासाठी विशेष खोली आहे. मात्र, आता ही विहीर मोडकळीस आलेली दिसते.वारसा माहीत नाही म्हणून जपवणूक होत नाही. पुणे, कोकण येथील वारसास्थळे दाखवली आणि त्यांची निगा राखली म्हणजे महाराष्ट्र धर्म साधला अशी मानसिकता आहे. मात्र, आपल्याकडील अनेक वारसास्थळे इतिहासाची साक्ष देतात. विदेशी विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. मात्र, आपल्याकडूनच या स्थळांची उपेक्षा होत आहे.- डॉ. शेषशयन देशमुख (ज्येष्ठ भारतीय विद्या अभ्यासक)