लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण भारताच्या केंद्रस्थानी असणाऱ्या झिरो माईलच्या सौंदर्यीकरणात नागपूरची भव्यता, नागपूरचे स्थळ माहात्म्य आणि नागपूरचा इतिहास ठसठशीतपणे दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी दिले.
"प्रत्येक शहराला एक इतिहास असतो. नागपूर शहराचा इतिहास हा प्राचीन आहे. तसाच तो भारताच्या रचनेमध्ये केंद्रस्थानी आहे. त्यामुळे झिरो माईल्सचे सौंदर्यीकरण भारताच्या हृदयस्थानी जोपासले जाईल असे असावे ", असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी फ्रान्सचे वास्तुविशारद नेमण्यात आले आहेत. यासंदर्भातील स्थानिक स्तरावरच्या सर्व मान्यता देण्यात येतील. रस्ता बंद करण्याबाबतच्या प्रश्नावरदेखील विभागीय आयुक्त हस्तक्षेप करून लवकर तोडगा काढतील, असे निर्देश आज पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
या बैठकीमध्ये सौंदर्यीकरण व विस्तारीकरणामध्ये झिरो माईल्सजवळून जाणाऱ्या रस्त्याची अडचण येत असल्याचे पुढे आले. भवन्स विद्यालयाकडून येणाऱ्या या रस्त्याला बंद केल्यास अधिक जागा मिळू शकते. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्री राऊत यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.