योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील रामझुला येथील अपघातामुळे संपूर्ण देशात हिट ॲंड रनचा मुद्दा चर्चेला आला होता. मात्र धनदांडग्यांकडून मस्तवालपणे कार चालविणे सुरूच आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका बेदरकार वाहनचालकाच्या मस्तीचा फटका तीन वाहनांना बसला. रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार मार्गावर एका ऑडी कारच्या चालकाने जवळपास दीडशे किलोमीटरच्या वेगाने कार चालवत दोन कार व एका दुचाकीला धडक दिली. काही कळायच्या आतच आरोपी कारने तेथून फरार झाला. या प्रकरणातील कार एका राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याची चर्चा असून पोलिसांकडून प्रकरणाबाबत माहिती देण्याचे टाळले जात आहे.
रामदासपेठेत रात्री साडेबारा ते पाऊण वाजेदरम्यान हा थरार झाला. त्या मार्गावर काही वाहने व दुचाकी उभ्या होत्या. काचीपुरा चौकाच्या दिशेने एक ऑडी कार भरधाव वेगाने आली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने दोन कार तसेच एका दुचाकीला धडक दिली. सुदैवाने धडक दिलेल्या कार व दुचाकीवरील तरुणांना जास्त जखम झाली नाही. त्यानंतर त्याच वेगाने ती कार लोकमत चौकाच्या दिशेने निघून गेली. यामुळे तेथे खळबळ उडाली. अनेक तरुण तेथे उभे होते व तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. सिताबर्डी पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळावर पोहोचले.
सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी कारचा चालक अर्जुन हावरे व रोनित चिंतमवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ते मद्याच्या नशेत होते का हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. संबंधित कार एका मोठ्या नेत्याशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे. आरटीओकडून कारची माहिती मागविण्यात आली असून त्यानंतरच आम्हाला काही बोलता येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे.