लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला खर्रा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला विकणाऱ्या पानटपऱ्यांविरुद्ध अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी धडक मोहीम राबवून ३० पानटपऱ्यांवरून ३४,३६० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. या पानटपरींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंड विधानअंतर्गत कारवाई करण्यात आली.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नागपूर कार्यालयाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईसाठी संपूर्ण नागपूर विभागातून एकूण १३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येऊन, त्यांची चार पथके तयार करण्यात आली. या पथकाने शहरातील विविध भागातील पानटपरींवर कारवाई केली. एकूण ३० पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली.अन्न व औषध प्रशासन नागपूर कार्यालयातर्फे प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. १ एप्रिल २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत नागपूर कार्यालयातर्फे एकूण १.२३ कोटी रुपये किमतीचा १४,९४२ वजनाचा साठा जप्त केला आहे. कार्यालयातर्फे १४ व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम १६६, २७२ व ३२८ अंतर्गत प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणारे व साठवणूक करणाऱ्या पेढ्यांना व त्यांच्या गोदामांना सीलबंद करण्यात आले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणे यालासुद्धा महाराष्ट्रात प्रतिबंध आहे. कार्यालयातर्फे १४ वाहने पकडून, ते जप्त करून वाहनांचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओ नागपूरकडे प्रस्ताव पाठविला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थप्रकरणी २१ खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अतिशय गंभीर असून, प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही प्रशासनातर्फे निरंतर कारवाई सुरू राहणार आहे.गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि विशेषत: युवावर्गाने अशा प्रकारचे सेवन करू नये, असे आवाहन सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
नागपुरात खर्रा, तंबाखू, गुटखा विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 8:43 PM
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला खर्रा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला विकणाऱ्या पानटपऱ्यांविरुद्ध अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी धडक मोहीम राबवून ३० पानटपऱ्यांवरून ३४,३६० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.
ठळक मुद्दे एफडीएची ३० पानटपरीवर कारवाई : अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई