नागपूर : बिल गेट्स फाऊंडेशनसाठी कार्य करीत असल्याची बतावणी करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे दाम्पत्य हरीश (६५) व गुम्फा तुमाने (६४) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा जोरदार दणका बसला. अजनी पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्याची या दाम्पत्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
सदर दाम्पत्य खापा, ता. सावनेर येथील रहिवासी आहे. अजनी पोलिसांनी नागपुरातील उंटखाना येथील मनोहर पत्रे यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नाेंदवला आहे. ही घटना २०१८-१९ मधील आहे. हरीश तुमाने स्वत:ला बिल गेट्स फाऊंडेशनचा मुख्य कार्यक्रम संचालक म्हणत होता. त्या आधारावर त्याने समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवली होती. दरम्यान, त्याची पत्रे यांच्यासोबत मैत्री झाली. त्याने पत्रे यांना मंदिराच्या नूतनीकरणाकरिता बिल गेट्स फाऊंडेशनकडून मोठी देणगी मिळवून देण्याचे वचन दिले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने मुलाचे लग्न जुळल्याचे सांगून पत्रे यांच्याकडून एक लाख रुपये तर, पत्रे यांच्या मित्राकडून दोन लाख रुपये उधार घेतले. त्याने ही रक्कम परत केली नाही. त्याने पत्रे यांचा फोन उचलणे बंद केले. तसेच, राहते घरही बदलले. त्यामुळे पत्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
--------------
सराईत गुन्हेगार
अजनी पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हरीश तुमाने सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले. तुमानेविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. त्याने मुंबईतील काही व्यक्तींनादेखील फसवले आहे अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सरकार पक्षाला आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून आरोपींना दणका दिला.