लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - बार, रेस्टॉरंट आणि वेगवेगळ्या आस्थापनाच्या संचालकांना ठरवून दिलेल्या वेळेत आस्थापना बंद करण्याचे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ४३ आस्थापना संचालकांना पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी गेल्या दोन दिवसात चालान कारवाईचा दणका दिला.
गुन्हेगारीसोबत कोरोनाचा धोका लक्षात घेत शहरातील बार रेस्टॉरंटच्या संचालकांसह विविध व्यापारी प्रतिष्ठाने आणि आस्थापना संचालकांना रात्री आपापली आस्थापना बंद करण्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. वेळेची मर्यादा न पाळणाऱ्यांवर कारवाई करू, अशा सूचनाही पोलिसांनी वारंवार दिलेल्या आहेत. मात्र, अनेक निर्ढावलेले दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने व्हॅलेन्टाईन डेच्या दोन दिवसात परिमंडळ दोनच्या उपायुक्त शाहू यांनी स्वत: उशिरा रात्रीपर्यंत वेगवेगळ्या भागात पाहणी करून ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू दिसलेल्या ४३ दुकानदारांवर चालानची कारवाई केली. त्यात आर्या बार ॲन्ड रेस्टॉरंट, बुल्लकार्ट बार, जश्न बार, सुविधा बार, एलबी हॉटेल, चिल्ड गर्ल रेस्टॉरंट, चेकर्स रेस्टॉरंट, फ्लेम ॲन्ड फायर रेस्टॉरंट, अशोका रेस्टॉरंट, डोमिनोज, बर्गरसिंग हॉटेल, मॅक्डोनल्ड रेस्टाॅरंट, पनिनो हॉटेल आदींचा समावेश आहे.
---
कोरोनाचे स्पॉट
शहरातील अनेक हॉटेल्स, बारमध्ये पुरेशी जागा नसताना ग्राहकांची गर्दी होताना दिसते. सध्या कोरोनाची झपाट्याने लागण वाढत आहे. अशात हे कोरोना स्पॉट ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---