नागपूर : नेहमीच सोबत राहणाऱ्या आरोपीने आपल्याच गुन्हेगार मित्राचा डोक्यावर काचेची बाटली मारल्यानंतर दगडाने ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
चंदनसिंह प्रमोद बंशकार (२६, रा. सूर्यनगर) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर संतोष ऊर्फ भाचा जितलाल पटीला (२०, रा. मिनीमातानगर) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. खून झालेला चंदनसिंह बंशकार आणि आरोपी संतोष उर्फ भाचा हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. चंदनसिंहचे वडिल एका शाळेत काम करतात. चंदनसिंहचे वय झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याचे लग्न करण्याच्या तयारीत होते. परंतु जबलपूरच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळल्याने चंदनसिंहने तिला पळवून नागपुरात आणले. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घरातून बाहेर काढले. तो प्रेयरीसोबत किरायाच्या खोलीत राहत होता. त्याला चोरी करण्याची सवय आणि दारुचे व्यसन होते. आरोपी संतोष उर्फ भाचा सोबत त्याची मैत्री होती. दोघेही नेहमीच सोबत दारु पीत होते. शुक्रवारी सायंकाळी चंदन आणि भाचा यांच्यात पेशांवरून भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात चंदनसिंह किरकोळ जखमी झाला आणि घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान भाचाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. चंदन हा घरी गेला. वडिलांनी डोक्याला मार लागल्याचे पाहून त्याला विचारना केली असता त्याने भाचाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. त्याने वडिलांना १०० रुपये मागितले.
वडिलांनी पैसे दिले आणि त्याला घरीच थांबण्यास सांगितले. परंतु पैसे घेऊन चंदनसिंह घरातून निघून गेला. तो कुकरेजा शाळेच्या मागे लपून बसल्याची माहिती भाचाला मिळाली. त्यामुळे शनिवारी रात्री भाचा तेथे पोहोचला. त्याने चंदनला पकडून त्याच्या डोक्यावर काचेची बाटली मारली. त्यानंतर दगडाने ठेचून त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच कळमनाचे सहायक पोलिस निरीक्षक तानाजी गव्हाणे यांनी घटनास्थळ गाठून चंदनला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी संतोष उर्फ भाचाला अटक केली.