लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्य विक्री करताना घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन न करता वारंवार उल्लंघन करणाऱ्या वर्षा वाईन शॉपच्या संचालकाला पोलिसांनी आज कारवाईचा दणका दिला. डीसीपी लोहित मतानी यांनी स्वतः या वाईन शॉपमध्ये जाऊन कारवाई केली.
गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षा वाईन शॉप आहे. मद्य विक्रेत्यांना मद्याच्या विक्री साठी प्रशासनाने घालून दिलेल्या अटी नियमाचे येथे उल्लंघन होत असल्याच्या सारख्या तक्रारी मिळत होत्या. त्यावरुन पोलिसांनी वाईन शॉपच्या संचालकाला वारंवार कारवाईचा इशारा दिला होता. मात्र त्याला न जुमानता वर्षा वाईन शॉपच्या संचालकांकडून अटी नियमांचे उल्लंघन केले जात होते.
शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास डीसीपी लोहित मतानी यांना ही माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह वर्षा वाईन शॉप गाठून संचालकाला बाहेर बोलावले. तेथे मद्य विक्री करताना होत असलेल्या अटी शर्तीच्या उल्लंघनाबाबत जाब विचारला. संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने मतानी यांनी कारवाईचा पवित्रा घेतला. महापालिका अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर वाईन शॉप मधील स्टॉक मोजण्यास सांगून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दुकानाला सील लावण्याचे निर्देश दिले. ही कारवाई रात्रीपर्यंत पूर्ण होईल, असे डीसीपी मतानी यांनी लोकमतला सांगितले.
---
कळमना, यशोधरानगरात उधाण
शहरातील अनेक ठिकाणच्या मद्य विक्रेत्यांकडून नियम धाब्यावर बसवून मध्य विक्री केली जात आहे. कळमना आणि यशोधरानगरातील परवानाधारक तसेच अवैध मद्य विक्रेत्याकडून रात्रंदिवस बिनधास्त मद्य विक्री केली जात आहे. या भागात अवैध मद्य विक्रीला उधाण आले आहे. पोलिसांना माहिती असूनही त्याकडे अर्थपूर्ण डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे या अवैध मद्यविक्रेत्यांना पोलिसांनी मूक संमती दिली की काय, अशी शंका घेतली जात आहे.
---