लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एचआयव्हीबाधितांनी नियमित औषधे घेतल्यास विषाणूंची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते. ‘एआरटी ड्रग्स’ योग्य पद्धतीने व नियमित घेणे हा या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु बहुतांश ‘एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन केंद्रा’वर(एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एचआयव्ही पॉझीटिव्ह म्हणून जगताना बहुतेकदा अज्ञान आणि गैरसमजापोटी औषधांबाबत रु ग्णांमध्ये जागरूकता नसते. नि:शुल्क मिळणारे औषध अचानक बाहेरून विकत घेण्यास त्यांची मन:स्थिती नसते. काहींची आर्थिक परिस्थिती नसते. फार कमी जण पदरमोड करून बाहेरून औषध विकत घेतात. याचा परिणाम, आजार वाढण्यावर होतो. मेडिकल, मेयोसह सर्वच ‘एआरटी सेंटर’वर गेल्या १५ दिवसांपासून एचआयव्ही बाधितांसाठी फारच आवश्यक असलेले ‘नेव्हीरॅपीन-२००’ व ‘इफाव्हीरेन्ज-६०० एमजी’ यासह इतरही औषधांचा तुटवडा पडला आहे. सूत्रानुसार काही दिवसांपूर्वी औषधांचा पुरवठा करणाºया ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’ने (नॅको) दोन महिने औषधांचा पुरवठा सुरळीत होणार नाही याची माहिती देऊन स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी करण्याच्या सूचना सर्व केंद्रांना दिल्या होत्या. त्यानुसार एक महिन्याच्या ‘नेव्हीरॅपीन’ व ‘इफाव्हीरेन्ज’ औषधांची खरेदी करण्यात आली. परंतु सध्याच्या स्थितीत या औषधांचा साठा दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच आहे. विशेषत: मेडिकल व मेयोचे ‘एआरटी’ सेंटरमध्ये बाधितांची संख्या मोठी असल्याने औषधे संपली आहेत. अनेक नव्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यासही सांगितले जात आहे.विना औषध मृत्यूचा धोकादीड महिन्यांपासून एचआयव्हीवरील औषधांचा तुटवडा पडल्याने विदर्भातील एआरटी केंद्रांवर उपचार घेणारे सुमारे पन्नास हजार एचआयव्हीबाधित प्रभावित झाले आहेत. यातच आर्थिक मागासेलपणामुळे अनेकांना केंद्रांवर औषधे घेण्यास येणे-जाणे परवडत नसल्याने औषधे घेणे बंद करण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास तुटवड्याचे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
नागपुरात एचआयव्हीबाधितांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:36 AM
एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठळक मुद्देएआरटी केंद्रावर औषधांचा तुटवडा : स्थानिक पातळीवर खरेदी केलेली औषधेही संपली