सुमेध वाघमारे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेजिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबईत जावे लागते. नागपुरात ही सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘एआरटी’सेंटरसाठी ‘व्हायरल लोड’ उपकरणाला मंजुरी देण्यात आली. मात्र वर्ष होऊनही केवळ ५० लाखांचे हे उपकरण अद्यापही खरेदी झालेले नाही. धक्कादायक म्हणजे, अनेक एचआयव्हीबाधित या तपासणीसाठी मुंबईला जात नसल्याचे सामोर आले आहे. यांची संख्या प्रत्येक केंद्रावर साधारण ५० टक्के असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.एचआयव्हीबाधितांना वेळेत उपचार व्हावेत , यासाठी सरकारने २००५ मध्ये ‘एआरटी’ सेंटर सुरू केले. ज्या बाधितांना ‘एआरटी’चे रेजिस्टंट झाले आहे त्यांच्यासाठी ‘सेकंड लाईन’ उपचारपद्धती नागपुरात २०११ पासून सुरू झाली. आता ही उपचारपद्धती यवतमाळ आणि अकोला येथेही सुरू आहे. या केंद्रामध्ये उपचारासाठी येणारा रु ग्ण आधीच शरीराने व मनाने खचलेला असतो. उपचारासोबत त्याला मानसिक आधार देणे गरजेचे असते.प्रतिकार शक्तीच नसल्याने अशा रु ग्णांना कोणत्याही आजाराचा संसर्ग लवकर होण्याची भीती असते. अशावेळी औषधांचा प्रतिरोध झाल्यास रु णाच्या रक्तातील ‘सीडी फोर’ मोजले जाते, मात्र रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी मुंबई गाठावी लागते. यासाठी शासनाकडून कुठलीही सवलत दिली जात नाही. आधीच रुग्णाची प्रकृती खालवली असल्याने त्यांना हा लांबचा प्रवास झेपत नाही. विशेष म्हणजे सेंकड लाईनच्या रुग्णाला दर सहा महिन्यांनी चाचणीसाठी मुंबईला जावे लागत असल्याने अनेक गरीब रुग्ण जाण्याचे टाळतात. या शिवाय मुंबईतल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर रिपोर्ट मिळण्यासही उशीर होत असल्याने उपचारातही उशीर होतो.
वर्षभरापूर्वीच ‘नॅको’ने दिली मंजुरीमिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’ने (नॅको) नागपूरच्या मेडिकलमधील एआरटी सेंटरसाठी सुमारे ५० लाखांचे ‘व्हायरल लोड’ यंत्र खरेदी करण्याला मंजुरी दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून हे यंत्र खरेदी होणार होते. परंतु नंतर काय झाले याचे कुणालाच माहीत नाही. विशेष म्हणजे, या यंत्रासोबत तंत्रज्ञ, स्वतंत्र वातानुकूलित जागेचीही गरज असून ती कोण सोडविणार हाही प्रश्न आहे.
५० टक्के रुग्ण ‘व्हायरल लोड’पासून वंचित‘सेकंड लाईन’ उपचार पद्धती सुरू असलेल्या ‘एआरटी’केंद्राच्या एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, रजिस्टर झालेल्या बाधितांचे समुपदेशन केल्यानंतरही ते ‘व्हायरल लोड’ साठी मुंबईत जात नाही. अशा रुग्णांकडून आम्ही लेखी लिहून घेतो. यांची संख्या सुमारे ५० टक्के आहे.
नागपुरात ‘व्हायरल लोड’ मशीन आवश्यकमेडिकलच्या एआरटी केंद्रावर सेकंड लाईन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच एचआयव्हीबाधितांना दर सहा महिन्यातून रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी (व्हायरल लोड) मुंबईला जावे लागते. अनेकांना हा प्रवास व प्रवसाचा खर्च, तेथे राहण्याचा खर्च झेपत नाही. अनेकांना याचे महत्त्व सांगूनही जात नाही. अशा रुग्णांच्या जीवाला धोका संभावतो. यामुळे नागपुरात ‘व्हायरल लोड’ मशीन उपलब्ध करून देणे अधिक गरजेचे आहे.-बबिता सोनीअध्यक्ष, संजीवन बहुउद्देशीय समाज सेवा संस्था