लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याच्या प्रकरणातील आरोपी व सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याची शुगर धोकादायक स्तरावर गेली आहे. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून जामीन देण्याची विनंती केली आहे. कारागृह प्रशासनाद्वारे आपली योग्य काळजी घेतली जात नाही, असा आरोप त्याने केला आहे.या प्रकरणावर शुक्रवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कारागृह प्रशासनाला त्यांच्या हलगर्जीपणासाठी फटकारले व बजाजला दोन आठवड्यासाठी मेडिकलमध्ये भरती करण्याचे निर्देश दिलेत. गत आॅगस्टमध्ये न्यायालयाने बजाजचे आरोग्य व आहाराची योग्य काळजी घेण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाचे पालन होत नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा बजाजवर आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसुल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठमोठ्या देणग्या घेत होता. तसेच, शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. बजाजतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व अॅड. उदय डबले यांनी कामकाज पाहिले.