नागपूर : राज्यात सत्ताबदलानंतर घडलेल्या राजकीय नाट्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. फडणवीस यांनी राज्यात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम दिल्लीतील भाजप नेत्यांनी केले असून, जाणूनबुजून त्यांचा ‘गेम’ केल्याची कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. दुसरीकडे फडणवीस समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’ लावले असून, त्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो मात्र गायब आहे. यावरून नवीन चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, राजकीय खेळीमध्ये कार्यकर्ते ‘क्लिन बोल्ड’ झाले. फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनादेखील असे काही होईल, याची कल्पना नव्हती. अडीच वर्षांच्या कालावधीत फडणवीस यांनी महाविकास आघाडीला वारंवार कोंडीत पकडले. कोरोना काळात राज्यभरात दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय विधान परिषद व राज्यसभा निवडणुकांत सर्व राजकीय जाणकारांना ‘चेकमेट’ केले. तरीदेखील केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद देणे हा त्यांच्या कार्याचा अपमान असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. यासंदर्भात भाजप पदाधिकारी उघडपणे भाष्य करत नसले तरी अंतर्गत गोटात याच चर्चा सुरू आहेत.
संदीप जोशींकडून ‘मानाचा मुजरा’
माजी महापौर व फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांनी फडणवीस हे त्यागमूर्ती असल्याची भावना होर्डिंग्जमधून मांडली आहे; परंतु त्यांच्या होर्डिंग्जमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता पक्षाच्या प्रोटोकॉलनुसारच फोटो घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर प्रोटोकॉलनुसार फोटो घेतले आहेत, तर मग त्यात केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा फोटोदेखील असायला हवा होता. अमित शहा यांचा फोटो नसला तरी प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो आहे. त्यामुळे खरोखरच त्यांनी पक्षाच्या ‘प्रोटोकॉल’चे पालन केले आहे की मनातील खदखद यातून बाहेर काढली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फडणवीसांसाठी शिवसेनेच्या घोषणेची उचलेगिरी
शंकरनगर चौकात भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या होर्डिंगमध्ये चक्क फडणवीसांची तुलना महाराष्ट्राच्या वाघासोबत करण्यात आली आहे. मुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी शिवसैनिक ‘कोण आला रे कोण आला...महाराष्ट्राचा वाघ आला’ अशा घोषणा द्यायचे. याच ओळी फडणवीसांसाठी वापरण्यात आल्या आहे.
शिंदेंच्या अभिनंदनाचेदेखील ‘होर्डिंग्ज’
मागील आठवड्यात एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे ‘होर्डिंग’ चितार ओळी चौकात लावण्यात आले होते व शिवसैनिकांनी ते फाडत आक्रमक पवित्रा घेतला होता; परंतु त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांचे अभिनंदन करणारे ‘होर्डिंग’ किरण पांडव यांनी लावले आहेत. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो असले तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेदेखील फोटो आहेत.
अशा आहेत भाजप कार्यकर्त्यांच्या भावना
- दिल्लीने परत एकदा मराठी माणसावर अन्याय केला आहे.
- प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व शेवटी स्वत: हे फडणवीसांनी सिद्ध केले.
- स्वत:चा अपमान सहन करून देश व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेला मोठा त्याग.
- एवढी वर्षे आपण मेहनत घेतली, वेळ आल्यावर फळ दुसऱ्याला द्यायचे... ये बात कुछ हजम नही हुई.
- भाजप नेतृत्वाकडून अनाकलनीय निर्णय.
- फडणवीसांचे मोठेपण जपणे ही पक्षाचीपण जबाबदारी नाही का? त्यांचा आत्मसन्मान जपायला हवा होता.